इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : आई आपल्या बाळाला खूपच जपत असते, तो अगदी खेळताना पडला तरी त्याला कुठे लागले नाही ना ? हे बघते, मात्र मुंबईत मुलुंड परिसरात एका मातेने अगदी कहरच केला. रागाच्या भरात तिने आपल्या बाळाला उंच इमारतीवरून खाली फेकून दिले, या घटनेत त्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्या मातेची मानसिक स्थिती बिघडलेली असल्याचे सांगण्यात येते.
मानसिक तणावातून घडली घटना
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनाली मेहता मूळ सुरत ( गुजरात ) येथील रहिवाशी असून काही दिवसांपूर्वी ती मुलंड परिसरात आपल्या आईकडे राहण्यासाठी आली होती. मनालीच्या पहिल्या बाळाचा जन्मानंतर ८ महिन्यातच मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांचे देखील निधन झाले होते. त्यामुळे मनाली तणावात होती. तिच्यावर मानसिक उपचार सुरू होते. तिचे हे दुसरे बाळ दीड महिन्यापूर्वी जन्माला आले होते, हशवी संकेत मेहता असे या बाळाचे नाव असून मनालीने आपल्या ३९ दिवसांच्या बाळाला इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली फेकले असून भयानक घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली.
घटनेमुळे परिसरात गर्दी जमा झाली
दरम्यान, या तणावातून पहाटेच्या सुमारास मनालीने आपल्या हशवीला इमारतीच्या १४ मजल्यावरून खाली फेकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. बाळ खाली पडल्याने जोरात आवाज झाल्याने परिसरात गर्दी जमा झाली. त्यानंतर स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आईनेच आपल्या बाळाला १४ व्या मजल्यावरून फेकल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून यानंतर पोलिसांनी मृत बाळाच्या आईवर गुन्हा दाखल करत तिला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
The mother threw her newborn from the 14th floor of the building.