इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – महाराष्ट्राच्या राजधानीत फिरणे सोपे आहे, पण मंत्रालयात प्रवेश करून एखादा विभाग शोधून काढणे केवळ अवघड. त्यातही मंत्रालयात प्रवेश करायचा म्हटल्यावर लांब रांगेत उभे राहावे लागणार आणि जेव्हा आपला नंबर येईल तोपर्यंत वेळ निघून जाणार, अशी बरेचदा स्थिती उद्भवते. आता तर मंत्रालयात प्रवेशाच्या नियमांमध्ये आणखी बदल करण्यात आले आहेत.
मंत्रालयात २५ विभाग असून त्यांचे टपाल मंत्रालयाच्या प्रवेशद्वारात द्यावे लागणार आहे. अभ्यागतांना मोबाइल अॅपवर संबंधितांच्या भेटीबाबत वेळेसाठी पूर्वनोंदणी करावी लागेल. ज्या विभागात काम आहे, त्याच मजल्यावर अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार आहे. शिवाय मंत्रालयाच्या छतावर जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात येणार आहेत. तसेच खिडक्या व बाल्कनीमधून उड्या मारण्याचे प्रकार बंद करण्यासाठी विशिष्ट प्रकारची यंत्रणा (अनव्हिजिबल स्टील रोप) लावण्यात येणार आहेत.
बरेचदा सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्यासाठी छतावर जाऊन आत्महत्या करण्याचा इशारा दिला जातो. मागे एकदा काही शेतकऱ्यांनी कर्जमाफी व पिकांना योग्य भाव मिळावा म्हणून अशा प्रकारचे आंदोलन केल्याची घटना घडली होती. मंत्रालयात दररोज जवळपास साडेतीन हजार तर मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी पाच हजार अभ्यागत येतात. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांच्याच मोटारगाड्यांना प्रवेश असणार आहे. तर सनदी अधिकाऱ्यांच्या गाड्या सचिव प्रवेशद्वारातून तर आमदार व इतरांच्या वाहनांना बगीचा प्रवेशद्वारातून आत येता येईल. मेट्रो सबवेमध्ये कर्मचारी व अभ्यागत यांच्या तपासणीसाठी कक्ष उभा करण्यात येणार आहे.
कॅशची बंधने १० हजारावर!
आमदार व लोकप्रतिनिधींसोबत मंत्रालयात येणाऱ्या लोकांनाही आता मंत्रालयात प्रवेश पासचे बंधन करण्यात आले आहे. यासोबतच पिशवी, बॅग किंवा दहा हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम मंत्रालयात नेता येणार नाही, असे गृह विभागाने स्पष्ट केले आहे. सुरक्षेचे हे सर्व नियम महिनाभरात लागू केले जाणार आहेत.
Beware! This can’t be taken in the Ministry anymore… Look, what restrictions for someone