इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबईच्या गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला तर ४० जण जखमी झाले. जखमींना मुंबईच्या ट्रॉमा केअर आणि कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या आगीत तळमजल्यावर वरील काही दुकाने आणि समोर पार्क असलेल्या गाड्या जळून खाक झाल्या आहे.
गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीला ही आग लागली होती. ग्राउंड प्लस पाच मजल्याची ही इमारत आहे. ही आग लागल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाला माहिती मिळताच हे दल तात्काळ दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न करत अडकलेल्या ३० जणांना सुखरूप बाहेर काढले. या आगीत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक पुढील तपास करत आहे. या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. ही आग लागल्यानंतर नागरिक झोपेत होते. मध्यरात्री तीन वाजता मोठा ब्लास्ट झाला त्यानंतर स्थानीक नागरिक जागे झाले. या इमारतीच्या लोकांना आग लागल्याचे कळाल्यानंतर ते बाहेर पडले. या इमारतीच्या पार्किंगमध्ये भंगाराचे दुकान आणि जुने कपडे ठेवण्यात आल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Massive fire in the parking lot of a building in Gorgaon, Mumbai; Seven people died and 40 people were injured