इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – महानायक अमिताभ बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी सिगारेटची जाहिरात केली म्हणून गोवा राज्याने त्यांच्यावर बंदी घातली होती. त्यानंतर त्यांनी कधीही सिगारेटची जाहिरात केली नाही. पण आता दुसऱ्याच एका जाहिरातीमुळे बीग बी वादात अडकण्याची शक्यता आहे.
फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलशी संबंधित जाहिरातीत अमिताभ बच्चन यांनी एक संवाद म्हटला आहे. त्या संवादावरून व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. कॉन्फेड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) या व्यापाऱ्यांच्या संघटनेने अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे. फ्लिपकार्टच्या ज्या जाहिरातीवरून वाद झाला आहे, त्यात अमिताभ बच्चन म्हणतात बिग बिलियन डे सेलमध्ये फोन ज्या किमतीत मिळतील, त्या किमतीत ते कोणत्याच मोबाईल स्टोअरमध्ये ऑफलाइन मिळणार नाहीत असे सांगताना दिसतात.
हा सेल ८ ते १५ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. दिशाभूल करणार्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आणि दिशाभूल करणार्या जाहिराती, २०२२ च्या नियम ४ नुसार, फ्लिपकार्टची जाहिरात दिशाभूल करणारी आहे. कारण त्यात सत्य नाही. ती पूर्णपणे चुकीची व दिशाभूल करणारी आहे, असे व्यापारी संघटनेचे म्हणणे आहे.
बच्चन यांना १० लाखांचा दंड?
व्यापारी संघटनेने सेंट्रल केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. त्यात ही जाहिरात दिशाभूल करणारी आणि देशातील छोट्या विक्रेत्यांविरुद्ध, दुकानदारांविरूद्ध असल्याचं म्हटलं आहे. खोट्या किंवा दिशाभूल करणार्या जाहिरातींसाठी ग्राहक संरक्षण कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार फ्लिपकार्टकडून दंड आकारण्यात यावा आणि बच्चन यांना १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा, अशी मागणी सीएआयटीने केली आहे.
तक्रारीत काय आहे?
कलम २(४७)नुसार भारताच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये विक्रेत्यांकडून मोबाईल फोन ज्या किमतीत विकले जात आहेत, त्याबाबत फ्लिपकार्ट जनतेची दिशाभूल केली आहे. यामुळे दुसर्या व्यक्तीच्या वस्तू, सेवा किंवा व्यापारावर परिणाम होतो, असे तक्रारीत नमूद आहे.
Big B Amitabh Bachchan in trouble… trade associations united…