इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – मुंबईत गणेशोत्सवाच्या कालावधीत रस्त्यांवर जबरदस्त गर्दी असते. त्यात दरवर्षी एकच विषय चर्चेला असतो आणि तो म्हणजे लालबागच्या राजाच्या दर्शनसाठी होणाऱ्या गर्दीचा. दरवर्षी काहीतरी गोंधळ होतोच. दोन दिवसांपूर्वीच भाविकांच्या तुफान गर्दीमुळे चेंगराचेंगरीचा प्रसंग होता होता टळला. पण आता तर चक्क भाविक आणि मंडळ पदाधिकाऱ्यांमध्ये फ्री स्टाईल रंगली.
लालबागच्या राजाच्या मंडळाच्या मंडपात दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचे दुर्दैवी चित्र महाराष्ट्राने बघितले. मंडळाचे कार्यकर्ते आणि भाविक आपापसांत भिडल्याचे पाहायला मिळाले. अशातच दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भक्तांना पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप सध्या केला जात आहे. लालबागचा राजा मंडळात भाविकांची रांग प्रचंड मोठी असते. कित्येक तास या रांगेत उभे राहावे लागते. अशातच काही वेळा गाभाऱ्यात प्रवेश करताना धक्काबुक्की होते. पण आता या घटनेनंतर लालबागचा राजा मंडळाच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
व्यवस्था नसल्याची तक्रार
मंडळाचे सदस्य आणि बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांमध्ये दररोज बाचाबाची होत असल्याची ही तक्रार असून, व्हीव्हीआयपींना दर्शन देताना विशेष व्यवस्था पुरवली जाते, मात्र वृद्ध आणि लहान मुलांकरता कोणतीही विशेष व्यवस्था नाही, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पहिली घटना नाही
लालबागच्या राजाच्या मंडळात असे प्रकार दरवर्षी घडत असतात. कधी पदाधिकारी आणि पोलिसांमधील हाणामारी, तर कधी पोलिसांकडून पत्रकारांवर करण्यात आलेली अरेवारी, तर कधी भाविकांना झालेली धक्काबुक्की… यासारखे प्रकार अनेकदा घडतात आणि त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
Freestyle – Lalbaghche raja