इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : परीक्षेत कॉपी तथा गैरप्रकार घडू नये म्हणून नेहमीच काळजी घेतली जाते, परंतु कोणतीही परीक्षा असो त्यामध्ये कॉपी-बहाद्दर काहीतरी युक्ती शोधून काढतातच. एमपीएससी सारख्या परीक्षांमध्ये तर अलीकडच्या काळात खूपच गोंधळ झाल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. आता देखील पुन्हा असाच प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पेपर फुटीचे प्रकार घडत असल्याने आता परीक्षा कशा प्रकारे घ्यावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत एका उमेदवाराने स्पाय कॅमेऱ्याचा वापर करुन प्रश्नपत्रिका तसेच उत्तपत्रिका उघड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
स्पाय कॅमेरा वापरल्याचा गैरप्रकार उघड
याबाबत अधिक माहिती अशी की, एमपीएससी परीक्षेत काही गोंधळ होऊ नये म्हणून सध्या काळजी घेतली जात आहे तरी काहीतरी प्रकार घडतच असतो त्यातच नवी मुंबईमधील बेलापूर परिक्षा केंद्रावर हा गैरप्रकार घडला असून याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या बेलापूर कार्यालयाकडून ३० एप्रिल रोजी अ गट, ब गट आणि क गट अशा सेवा पदभरती करिता ही परीक्षा घेण्यात आली. यावेळी स्पाय कॅमेरा वापरल्याचा प्रकार समोर आला असून उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराविरुद्ध परीक्षा केंद्रावर या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
एकाकडून दुसऱ्याला दुसऱ्याकडून तिसऱ्याला प्रश्नपत्रिका गेली
एमपीएससीची परीक्षा देणारा आकाश घुनावत (मुळ रा. जालना ) असे या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव असून आकाश घुनावत याने हडपसर येथील जेएसपीएम जयवंतराव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सेट ‘बी’ची प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका स्पाय कॅमेऱ्याद्वारे जीवन नायमाने या व्यक्तीला पाठविली होती.
त्यानंतर जीवन नायमाने याने ही प्रश्नपत्रिका शंकर जारवाल याच्या मोबाईलवर पाठवली. अशाप्रकारे एकाकडून दुसऱ्याला दुसऱ्याकडून तिसऱ्याला ही प्रश्नपत्रिका गेली याप्रकरणात बेलापूर पोलिसांनी विद्यार्थ्यासह तीन जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकारामुळे पुन्हा एकदा एमपीएससी परीक्षा चर्चेत आली असून मोठी खळबळ उडाली आहे.
High Tech Copy in MPSC Exam..