नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने कार्यान्वित केलेल्या राष्ट्रीय करियर सेवा (एनसीएस) पोर्टलच्या कार्यात सहभागी होण्याच्या उद्देशाने प्रमुख खासगी नोकरीविषयक पोर्टल्स, कंपन्या/ नियोक्ते आणि कौशल्य प्रदाते यांच्याशी आज सामंजस्य करार केला. एनसीएस पोर्टलच्या मदतीने नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना उपलब्ध असलेल्या रोजगार संधी आणि सेवा यांमध्ये सुधारणा करणे हा या कराराचा मुख्य उद्देश आहे.
केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाशी भागीदारी केलेले खासगी नोकरीविषयक पोर्टल्स त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रिक्त पदांची माहिती एनसीएस वर सामायिक करतील जेणेकरुन, एनसीएस मध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांना अशा रिक्त पदांसाठी सुरळीतपणे अर्ज करता येईल.
खासगी नोकरीविषयक पोर्टल्सवर नोकरीच्या संधीमुळे एनसीएस पोर्टलवरील नोंदणीकृत उमेदवारांना जास्त प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होतील. ई-श्रम मंचावर नोंदणी केलेले, असंघटीत क्षेत्रातील जे ३० लाखांहून अधिक कामगार आतापर्यंत एनसीएस पोर्टलमध्ये सहभागी झाले आहेत त्यांना देखील या भागीदारीचा लाभ होणार आहे.
अशा प्रकारची भागीदारी देशातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे या मुद्द्यावर केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय सचिव आरती आहुजा यांनी या प्रसंगी बोलताना, अधिक भर दिला. जी-20 रोजगारविषयक कृतिगटातील सदस्यांनी देखील एनसीएस पोर्टलच्या कार्याची प्रशंसा केली असे त्यांनी आवर्जून नमूद केले. एनसीएस पोर्टलच्या माध्यमातून नोकरी शोधणारे आणि नोकरी पुरवणारे अशा दोन्ही बाजूंना अधिक उत्तम प्रकारे सेवा देता यावी म्हणून, विविध सरकारी आणि खासगी संघटनांशी या पोर्टलची अधिकाधिक प्रमाणात भागीदारी व्हावी, अशी इच्छा आरती आहुजा यांनी यावेळी व्यक्त केली.
MoU of Ministry with various private job portals