इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई -एकीकडे गुलाबी थंडी सुरू असताना दुसरीकडे अवकाळी पाऊस पडत आहे. ‘वेस्टर्न डिस्टबर्न्स’मुळे महाराष्ट्रासह देशाच्या अन्य भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने तसा अंदाज व्यक्त केला आहे.
राज्यासह देशात गुलाबी थंडी जाणवत आहे. त्याच वेळी ऊन-पावसाचा खेळ सुरू झाला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हा पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊन होईल.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये पुढील पाच दिवसांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ११ नोव्हेंबरपर्यंत येथे पाऊस पडेल. येत्या काही दिवसांत महाराष्ट्र, ओडिशा आणि गोव्यातही पाऊस पडू शकतो. जम्मू-काश्मीरमध्ये पाऊस किंवा बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमवर्षाव आजपासून सुरू होईल. उत्तराखंडमध्ये नऊ आणि दहा तारखेला पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे. हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये उद्यापासून हलका पाऊस पडू शकतो. मध्य आणि पूर्व भारतात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. आसाम आणि मेघालयमध्ये काही ठिकाणी पाऊस पडेल.
Forecast of rain in the state for the next 48 hours….Meteorological department