पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना विश्वकर्मा आदर्श कामगार पुरस्कार आणि कामगार भूषण पुरस्कार २०२२-२३ करीता १८ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठेच्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराचे नाव आता विश्वकर्मा आदर्श कामगार पुरस्कार करण्यात आले असून महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत कामगार कल्याण निधी भरणारे दुकाने, कंपन्या, कारखाने, वर्कशॉप्स, हॉटेल्स, उपहारगृहे, बँका आदींमध्ये कार्यरत कामगार व कर्मचारी यांना पुरस्कारांसाठी अर्ज करता येणार आहे.
सेवेत असताना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा संघटन आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५१ कामगारांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. २५ हजार रूपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. कामगाराची विविध आस्थापनांमध्ये मिळून किमान ५ वर्ष सेवा झालेली असावी.
मंडळाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त होऊन किमान १० वर्षे सेवा झाली असेल अशा कामगारांकडून कामगार भूषण पुरस्कारासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. राज्यभरातून एका कामगाराची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार असून ५० हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
मंडळातर्फे लीन नंबर (लेबर आयडेंटिटी नंबर) देण्यात आलेल्या कामगारांना https://public.mlwb.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज व शुल्क भरल्याची पावती अर्जदारास मंडळाच्या संबंधित कामगार कल्याण केंद्रास प्रत्यक्ष भेट देऊन सादर करावयाची आहे. त्याआधारे अर्जदारास केंद्रातून ऑफलाईन अर्ज दिला जाईल.
अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयास १८ ऑक्टोबरपर्यंत पोस्टाद्वारे अथवा हस्तपोच सादर करावयाचा आहे. तसेच आर्थिक अडचणीमुळे मागील ३ वर्षात बंद पडलेल्या आस्थापनांतील कामगारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करता येणार असून त्यांची आस्थापना, कंपनी बंद होऊन डिसेंबर २०२२ मध्ये ३ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी कालावधी झालेला असावा.
अर्ज मंडळाच्या संकेतस्थळावर तसेच राज्यातील मंडळाच्या सर्व कामगार कल्याण केंद्रांत पुरस्काराचे अर्ज उपलब्ध असून गुणवंत कामगारांनी पुरस्कारांसाठी अर्ज करण्याचे आवाहन कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे, विभागाच्या प्रधान सचिव विनिता वेद सिंगल आणि मंडळाचे कल्याण आयुक्त विराज इळवे यांनी केले आहे.
Rewards will be given to meritorious workers