इंडिया दर्पण वृत्तसेवा
मनमाड – मनमाडमधील आंबेडकर नगर, सिकंदर नगर परिसरात कुत्र्याने उच्छाद घालीत गणेश मंडळाच्या मंडपापुढे उभ्या असलेल्या नागरिकांवर हल्ला चढवीत आठ ते नऊ जणांना चावा घेऊन जखमी केले. जखमीमध्ये चार लहान मुलांचा समावेश आहे.
या जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यांवरून फिरत असल्याने नागरिकांना रस्त्याने चालणे मुश्किल झाले आहे. नपा प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून या मोकाट कुत्र्यांचा सर्वत्र उच्छाद सुरु आहे. चांदवडला गेल्या वर्षी कुत्र्याने अनेक जणांना जखमी केले होते. मनमाडला नेमकं तेच घडले आहे.