इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अभियांत्रिकी सेवा जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता राजपत्रित अधिकारी पदावर निवड होऊनही राज्य शासनाने नियुक्ती न दिल्याने नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील अजंग येथील उच्च शिक्षित तरुणावर उदरनिर्वाहासाठी अक्षरशः मेंढ्या चारण्याची वेळ आली आहे.
श्रावण गांजे हा उच्च शिक्षित तरुण मात्र आज तो हातात काठी व गळ्यात उपरणे घालून जगण्याच्या संघर्षासाठी त्याच्यावर दिवसभर रानोमाळ मेंढ्या हाकण्याची वेळ आली. २०२० मध्ये निघालेल्या लोकसेवा आयोगाच्या जाहीरातीनुसार उच्च पदस्थ अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून श्रावण गांजे या तरुणाने अथक मेहनत घेत रात्रंदिवस अभ्यास करून त्याने यशही संपादन केले.
ऑगस्ट २०२२ मध्ये परीक्षेचा निकालही लागला. मात्र दीड वर्ष उलटूनही श्रावणला नियुक्ती मिळाली नाही. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अखेर उदरनिर्वाहासाठी त्याला पारंपारिक मेंढपाळ व्यवसाय करावा लागत आहे. उच्च शिक्षण घेऊन मेंढ्या हाकत असल्याने अनेक जण त्याला याबाबत विचारत असतात. नियुक्ती देण्याबाबत शासनाकडून अंमलबजावणी करण्यास एसइबीसी प्रवर्गाचे कारण पुढे केले जात आहे.
तर उच्च न्यायालयाकडून एसइबीसी प्रवर्गाचे १० टक्के उमेदवार वगळून ९० टक्के उमेदवारांना नियुक्ती देण्याचे निर्देश दिले आहे. मात्र शासनाकडून त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे श्रावण गांजे प्रमाणेच राज्यातील जवळपास १९० उमेदवारांवर अशीच वेळ आली आहे. ३ ऑक्टोबर पासून हे तरुण मुंबईमध्ये शासनाच्या विरोधात आंदोलन छेडणार आहे. शासनाने तातडीने या तरुणांना नियुक्ती देऊन त्यांचा उदरनिर्वाहाचा संघर्ष थांबविण्याची गरज आहे.
Despite passing MPSC, the youth of Malegaon taluka has to turn sheep because there is no job…