रामदास शिंदे
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या शतकी परंपरा असलेल्या संघटनेचे विद्यमान राज्यध्यक्ष अंबादास वाजे यांचे बुधवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
पेशवाईचा इतिहास असलेल्या डूबेरे ता. सिन्नर येथील रहिवासी असलेले अंबादास वाजे यांनी गत ३० वर्षापासून अखंडीत शिक्षक संघासाठी स्वतःला वाहून घेतले होते. शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या खांद्याला खांदा लावत चांदा ते बांधा आख्खा महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला होता. तालुकाध्यक्ष पासून सुरू झालेली त्यांची संघटनात्मक कारकिर्द त्यांच्यातील नेतृत्व गुणांमुळे राज्याच्या अध्यक्षपदापर्यंत पोहचली होती. शिक्षकांसह विद्यार्थी, पालक, समाजाप्रती अतूट प्रेम असलेले वाजेसर आज लाखो शिक्षकांना पोरके करून गेले.
शिक्षकांचे पंचप्राण असलेले वाजे सरांच्या नेतृत्वात २ तारखेला महाराष्ट्रभर १० लाख शिक्षकांनी आक्रोश मोर्चा काढला. स्वतः सर नाशिकच्या मोर्चात अग्रस्थानी होते. जिल्हाधिकारी साहेबांशी झालेल्या चर्चेत अत्यंत मुद्देसूत प्रश्न मांडून आपल्यातील नेतृत्व गूण त्यांनी सिध्द केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. अंबादास वाजे सरांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात असून प्राथमिक शिक्षक संघावर शोककळा पसरली आहे.
Death of Ambadas Waje of Maharashtra State Primary Teachers Union