इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – मंत्र्यांची बनावट स्वाक्षरी करून कारभार करणारे आजवर अनेक बघितले असतील, पण घरबसल्या उपमुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी कॉपी करून थेट बदलीचे आदेश काढण्याचा प्रकार महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदाच घडला असावा. या प्रकरणातील मुख्य आरोपी इलेक्ट्रीकल इंजिनियर असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत. त्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण राज्याच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. पण उलट त्यांचेच कार्यालय सुरक्षित नसल्याची प्रचिती महाराष्ट्राला आली. फडणविसांचे विशेष कार्यकारी अधिकारी विद्याधर महाले यांचा कार्यालयीन ई-मेल आयडी हॅक करून महावितरणमधील काही अधिकाऱ्यांच्या बदलीचे बनावट आदेश काढण्यात आले. हा सारा कारभार मोहम्मद इलियास याकूब मोमीन या ४० वर्षीय व्यक्तीने मीरज येथे त्याच्या घरी बसून केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्याचा सायबर विभाग या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहे. मोहम्मद इलियास हा खासगी कंत्राटदार आहे. त्याने महावितरणच्या सहा अधिकाऱ्यांसोबत आर्थिक व्यवहार ठरविला आणि त्यानंतर बदलीचे आदेश काढले. त्यासाठी त्याने फडणविसांची स्वाक्षरीही कॉपी केली.
अधिकाऱ्यांचीही कसून चौकशी
गणेश असमर, दुर्गेश जगताप, मनीष धोटे, यशवंत गायकवाड, ज्ञानोबा राठोड आणि योगेश आहेर या सहा अधिकाऱ्यांकडून पैसे घेऊन इलियासने बदलीचे आदेश काढून दिले. या सर्व अधिकाऱ्यांची आता कसून चौकशी होणार आहे.
Direct transfer orders by copying Fadnavis’s signature… revealed