नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोठ्या परीक्षेपूर्वी छोट्या परीक्षांमधून आपली क्षमता तपासण्याची संधी असते. राजकारणातही तसेच आहे. लोकसभेची निवडणूक ही सर्वांत मोठी मानली जाते. पण त्या निवडणुकीमध्ये आपली काय स्थिती असणार आहे, याचा अंदाज राजकीय पक्ष विधानसभेच्या निवडणुकांवरून लावतात. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील भाजपपुढे अशाच परीक्षेचे आव्हान असणार आहे.
जिगर मुरादाबादी यांचा एक शेर आहे… ‘ये इश्क नहीं आसाँ इतना ही समझ लीजे… ये आग का दरिया है और डुब के जाना है’. खरे तर लोकसभा निवडणुकीला हा शेर फीट बसतो की नाही, हे सांगता येणार नाही. पण हे सारे खूर्चीच्या प्रेमापोटी चालले आहे हे निश्चित आहे. लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त करून देशात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि इंडिया आघाडीला छत्तीसगड, राजस्थान आणि मध्यप्रदेश या तीन निवडणुकींचा ‘आग का दरिया’ पार करावा लागणार आहे. कारण या तिन्ही राज्यांमध्ये जो कौल येणार आहे, त्यावरच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे. एका कंपनीने या तिन्ही राज्यांचे सर्वेक्षण करून राजकीय भवितव्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यात मध्य प्रदेशात भाजप आपली सत्ता राखेल असे म्हटले आहे. उलट भाजपच्या जागांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
गेल्यावेळी २०१८ मध्ये काँग्रेसने सत्ता काबीज केली होती. पण अवघ्या पंधरा महिन्यांत सिंदिया यांच्यासह २२ आमदारांनी काँग्रेस सोडल्याने सरकार कोसळले आणि शिवराजसिंह यांचे सरकार आले. यंदा इतिहासाची पुनरावृत्ती होईल, असा अंदाज सर्वेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. २३० जागा असलेल्या मध्य प्रदेशात २०१८ साली काँग्रेसचे ११४ आणि भाजपाचे १०९ आमदार निवडून आले होते. बहुजन समाजवादी पक्षाला २ जागा मिळाल्या होत्या. २०२३ च्या सर्वेनुसार भाजपाचे ११६ ते १२४ आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. तर, १०० ते १०८ जागा मिळू शकतात. भाजपा ४२ आणि काँग्रेसला ४० टक्के मते मिळू शकतात, असे हा सर्वे म्हणतो. आयएनएस कंपनीच्या ‘पोलस्ट्रॅट’ने १ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या कालावधीत हा सर्वे केला.
काँग्रेस राखणार राजस्थान व छत्तीसगड ?
या सर्वेनुसार काँग्रेस राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आपले सरकार राखेल, असे म्हटले आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचं सरकार आहे. २०१८ साली २०० पैकी १०० जागांवर काँग्रेसचे आमदार निवडून आले होते. सर्वेनुसार २०२३ साली काँग्रेस पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे. काँग्रेसला ९७ ते १०५ जागा मिळण्याची शक्यता आहे. २०१८ साली छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत १५ वर्षानंतर सत्तांतर झाले. विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसचा ९० पैकी ६८ जागांवर दणदणीत विजय झाला होता. भाजपा ४९ जागांवरून १५ वर आली होती. सर्वेनुसार काँग्रेसला ६२ जागा मिळू शकतात. भाजपाच्या १२ जागा वाढून २७ आमदार निवडून येण्याची शक्यता आहे.