इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोल्हापूर : शहर धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण मानले जाते, मात्र आता शहरात गणेशोत्सव सुरु झाल्यापासून तलवार व कोयत्याचा वापर करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कसबा बावड्यात पाठलाग करून कोयता हल्ल्याची घटना नुकतीच घडली असताना आता बोंद्रेनगरात तलवार हल्ला केल्याची घटना घडली. दुसरीकडे, बावड्यात भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर हल्ला करून दहशत माजवण्यात आली. यावेळी दुचाकींचे नुकसान करून शेजाऱ्यालाही मारहाण करण्यात आली. बावड्यातील आंबेडनगरमध्ये झालेल्या कोयता हल्ल्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
सुमारे २० जणांच्या टोळक्याने तलवार व लाठी केला हल्ला
गेल्या काही दिवसांपासून शहरात तणावाचे वातावरण आहे कारण शहरातील बोंद्रेनगर परिसरात जांभळे कॉलनीत पूर्ववैमनस्यातून तलवार आणि लाठी हल्ल्यात आनंदा बोडेकर (वय २३) हा तरुण जखमी झाला. यावेळी वाद सोडवण्यासाठी गेलेली त्याची आई आणि पत्नीलाही धक्काबुक्की करण्यात आली. रात्री साडेनऊच्या सुमारास हा हल्ला झाला. आनंदा हा सोनार काम करणारा असून काम संपल्यानंतर गणेश मंडळात आरतीसाठी गेला असताना सुमारे २० जणांच्या टोळक्याने तलवार व लाठी हल्ला केला. यावेळी त्याची आई आणि पत्नीने आनंदाला सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर दोघींनाही धक्काबुक्की करण्यात आली. जखमी आनंदाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
६ संशयितांविरोधात शाहुपुरी पोलिसांकडे गुन्हा दाखल
पोलीस एका घटनेचा तपास करत नाही, तोच पुन्हा दुसरी अशाच प्रकारे हल्ल्याची घटना घडली. बावड्यातील कोयता हल्ल्याची घटना ताजी असतानाच भाजप पदाधिकारी सदानंद राजवर्धन यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. आंबेडकरनगरमध्ये हा प्रकार घडला. राजवर्धन यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर ६ संशयितांविरोधात शाहुपुरी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमारे१५जणांच्या जमावाने शिवीगाळ करत घरासमोर लावलेल्या दुचाकींचे नुकसान केले. पती सदानंद यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. शेजारच्या मयुरेश शिंगे यांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
डोक्यासह अंगावर वार
नेमक्या सण उत्सवाच्या काळातच अशा वाईट घटना घडत आहेत. दरम्यान, कसबा बावड्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानात झालेल्या कोयता हल्ल्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यामध्ये एकूण १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल कांबळे (वय २४ रा.आंबेडकर नगर) याला अटक करण्यात आली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, कोयता हल्ल्यात जखमी सुरज कांबळेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. सूरजच्या डोक्यात, हातावर आणि पाठीवर वार झाले आहेत. हल्ला होताना त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या वैभव माजगावकरवर सुद्धा हल्ला करण्यात आला होता. सध्या सण उत्सवाच्या काळात शहरात अशांतता निर्माण झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Hooliganism in Kolhapur during the festival