वृषाली पाटील
कोल्हापूरचा शाही दसरा देशभरात प्रसिध्द असून त्याला ऐतिहासिक वारसा आहे. संस्थान काळात तर हा दसरा राजेशाही थाटात.. मोठ्या दिमाखात साजरा होत होता. कोल्हापूरचा हा दसरा महोत्सव देश विदेशात पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासनासह राज्य शासन प्रयत्नशील आहे. यावर्षी दसऱ्या दिवशी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पारंपरिक पध्दतीने होणाऱ्या सीमोल्लंघनाबरोबरच राजेशाही परंपरा कायम ठेवत भव्यदिव्य पध्दतीने शाही दसरा साजरा होणार आहे. जुना राजवाडा ते दसरा चौक दरम्यान छबीना, लवाजमा, पारंपरिक वाद्य, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, राजेशाही पोषाखातील राज घराण्यातील वंशज व पारंपरिक वेशभुषा अशा दिमाखात नागरिकांच्या सहभागाने दसरा महोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी दिनांक 15 ते 24 ऑक्टोबर 2023 दरम्यान विविध उपक्रम, स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होवून आपणही या ऐतिहासिक शाही दसरा महोत्सवाचे साक्षीदार होवूया… !
घटस्थापनेदिवशी होणार उद्घाटन– दसरा महोत्सवाला घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे. यादिवशी रविवार 15 ऑक्टोबर रोजी भवानी मंडप येथे सायंकाळी 5 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यटन परिचय केंद्र व पर्यटन प्रदर्शनाच्या उद्घाटनाने महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या दिवसापासून भवानी मंडप परिसरातील पागा इमारतीत जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचे महत्व व माहिती देणारे प्रदर्शन व कायम स्वरुपी माहिती केंद्र सुरु होणार आहे.
पारंपरिक वेशभूषेवर भर – पारंपरिक कला संस्कृतीचा वारसा जपणारा कोल्हापूर जिल्हा आहे. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी सोमवार 16 ऑक्टोबरला जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये पारंपरिक वेशभुषा दिवस साजरा करण्यात येणार असून यापुढे दरवर्षी नवरात्रीचा दुसरा दिवस संपूर्ण जिल्ह्यात पारंपरिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात येणार आहे. याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजता दसरा चौक रंगमंचावर शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सव विजेत्या संघाच्यावतीने लोककलांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी– महोत्सवात 17 ते 21 ऑक्टोबर दरम्यान दसरा चौकातील रंगमंचावर सायंकाळी 6.30 ते 9 यावेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे. मंगळवार 17 ऑक्टोबर रोजी मराठी संस्कृती आणि सण-वारांवर आधारित नृत्य संगीताचा आविष्कार असणारा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा 80 कलाकारांचा सहभाग असलेला सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. बुधवार 18 ऑक्टोबर रोजी राजेश देशपांडे दिग्दर्शित व भाऊ कदम, ओंकार भोजने अभिनित ‘करुन गेलो गाव’ हे नाटक तर गुरुवार 19 ऑक्टोबरला दादा कोंडके यांच्यावर आधारित कलाविष्कार कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यात ‘चला हवा येवू द्या’ फेम प्रख्यात कलाकार भारत गणेशपुरे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे व अन्य 35 कलाकारांचा सहभाग असेल. तसेच लहान मुलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळालेले ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक शुक्रवार 20 ऑक्टोबरला सादर होणार आहे. नवरात्र म्हणजे देवीचा जागर घालणारा उत्सव.. याचसाठी शनिवार 21 ऑक्टोबर रोजी सिनेतारकांचा ‘नवदुर्गा.. नवतारका’ हा संगीत व नृत्य- नाट्य कार्यक्रम होणार आहे. यात दूरचित्रवाणीवरील बहुतांशी अभिनेत्री सहभागी होणार आहेत..
नारी शक्तीचा प्रत्यय देणार नवदुर्गांची शोभायात्रा– सध्याच्या युगात सक्षमपणे काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा सहभाग असणारी शोभा यात्रा (बाईक रॅली) गुरुवार 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दसरा चौक ते भवानी मंडप – बिंदू चौक – उमा टॉकीज – रेल्वे पुल- कावळा नाका- दसरा चौक या मार्गाने ही रॅली मार्गक्रमणा करेल. घोषवाक्य, प्रबोधनपर फलक यासह विद्यार्थिनी, शिक्षक, वकील, अधिकारी, पत्रकार, डॉक्टर, परिचारिका, इंजिनियर, पोलीस, होमगार्ड आदी क्षेत्रांतील महिलांचा सहभाग यात्रेची शोभा वाढवणार आहे.
कौशल्यपूर्ण क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन– देशात विविध प्रकारचे पारंपरिक युद्ध प्रकारांचे सराव करणारे खेळाडू आहेत. कोल्हापूरला मर्दानी खेळांची परंपरा आहे. या कौशल्यपूर्ण क्रीडा प्रकाराला प्रोत्साहन मिळावे व सर्वांना या खेळांचा परिचय व्हावा, यासाठी 20 व 21 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे सकाळी 8 ते 11.30 व सायंकाळी 4 ते 7.30 यावेळेत भारतीय युद्धकला प्रात्यक्षिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
रचना शिल्प प्रात्यक्षिकासह अनुभवायला मिळणार मजा..- 22 ते 24 ऑक्टोबर दरम्यान सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत महावीर कॉलेज ते खानविलकर पेट्रोल पंप मार्गावर रचना शिल्प प्रात्यक्षिक व स्पर्धा होणार आहे. रविवार 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते 11 यावेळेत दसरा चौक ते जयंती पुल रस्ता हा फन स्ट्रीटवर जुने खेळ, आट्या पाट्या, गलोर, गोट्या, भोवरा, गाणी, चित्र, मार्शल आर्ट, मर्दानी खेळ, गो कारटिंग, महिलांसाठी लेझीम आदी मजा अनुभवायला मिळेल. रविवार 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत महाव्दार रोडवर गालिचा रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
करवीरच्या लेकीचा होणार सन्मान– राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कर्तृत्ववान ठरलेल्या कोल्हापुरच्या लेकीचा (महिलेचा) गौरव होणारा ‘करवीर तारा सन्मान’ कार्यक्रम सोमवार 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे.
शाही थाटात सीमोल्लंघन– पारंपरिक विजयादशमीचा सण दरवर्षी करवीरनगरीत ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न होतो. प्रारंभी करवीर निवासिनी श्री अंबाबाई, जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी आणि गुरु महाराज यांच्या पालख्यासह आणल्या जातात. यानंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व त्यांच्या कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन होते. यावेळी पोलीस विभाग व टी.ए. बटालियनच्या बँड पथकाकडून करवीर संस्थानचे गीत वाजवून स्वागत होते. औक्षण झाल्यानंतर पारंपरिक पध्दतीने विधीवत पूजा होवून देवीची आरती होते. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाल्यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील सदस्यांनी सोने लुटताच करवीरवासिय नागरिक अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटतात. श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह राजघराण्यातील सदस्यांना सोने देवून नागरिक दसऱ्याचा आंनद साजरा करतात.
यावर्षी मंगळवार 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता भवानी मंडप ते दसरा चौक व नवा राजवाडा ते दसरा चौक या मार्गावर होणाऱ्या शाही दसरा मिरवणूकीत ढोल ताशा पथक, लेझिम पथक, मावळा पथक विविध कला सादर करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंचाही लवाजाम्यामध्ये समावेश असणार आहे.
दसरा महोत्सवाअंतर्गत 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान होणारे सर्व कार्यक्रम विनामुल्य असून नागरिकांसाठी खुले राहणार आहेत. कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवातील सर्व कार्यक्रमांचा लाभ नागरिकांनी घ्यावा व दसऱ्याचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.
वृषाली पाटील,
माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, कोल्हापूर.
Such is the historic Dussehra festival of Kolhapur.