इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणजवळ आरोग्यसेविका स्वरूपा विजय शिदें (३०) यांचा दुचाकी – एसटी अपघातात मृत्यू झाला. त्या दुचाकीवरुन जात असतांना त्यांचा तोल गेल्याने त्या खाली कोसळल्या. अन त्यावेळी एसटीच्या मागील चाकाखाली त्या सापडल्या. यावेळी डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्याबरोबर दुचाकीवर असलेले आरोग्य सेवक हेही गंभीर जखमी झाले असून त्यांना मलकापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर एसटी चालक सागर पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करंजफेणमध्ये सावर्डेमधील सोनाली सुरेश कांबळेच्या प्रसुतीसाठी पुनाळमधील आरोग्य सेवक हैबती मगदूम यांच्या सोबत जात होत्या. त्यावेळी करंजफेण गावाजवळ कोल्हापूरला जात असलेली एसटी समोरुन आली. त्यामुळे शिंदे या दुचाकी बाजूला घेत असताना त्यांच्या दुचाकीचे पुढचे चाक घसरले. त्यातच त्यांचा दुचाकीवरून तोल गेला. त्यामुळे हैबती मगदूम व स्वरुपा शिंदें खाली कोसळल्या. यावेळी स्वरुपा शिंदे एसटीच्या मागील चाकाखाली सापडल्या.
शिंदे यांच्या पश्चात मुलगा असून तो चौथीत आहे, तर मुलगी अंगणवाडीत शिकत आहे. त्यांचे पती विजय शिंदे प्राथमिक शिक्षक आहेत. या घटनेमुळे नणुंद्रे गावावर शोककळा पसरली आहे. स्वरुपा शिंदे यांच्या नव्या घराची वास्तूशांती झाली आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वी त्या नव्या घरात राहण्यासाठी गेल्या होत्या. त्यात ही दुर्घटना घडल्यामुळे शिंदे परिवाराला मोठा धक्का बसला आहे.
Unfortunate death of a healthcare worker in an accident while going for delivery at a primary health center