इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सर्वांवरील संकट, विघ्न दूर करणाऱ्या विघ्नहर्ता गणरायाचा उत्सव नुकताच संपला. मात्र, हा उत्सव संपण्याच्या अंतिमदिनी अर्थात अनंत चतुर्दशीला एका महिला उपअभियंत्यावर अटकरूपी विघ्न ओढवले. लाचखोरीच्या प्रकरणात त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
जलजीवन नळपाणी पुरवठा कामाचे १२ लाख रुपयांचे बिल मंजूर केले म्हणून तीन टक्के कमिशन म्हणून ३३ हजार रुपयांची मागणी चंदगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची उपअभियंता सुभद्रा लक्ष्मणराव कांबळेने (रा. बेळगाव, हनुमान नगर, भक्तीवेस मंगल कार्यालयाजवळ, मूळ पत्ता, सी वन-५०६, साकेत पॅराडाईज, आधारवाडी जेल रोड, कल्याण पश्चिम जि. ठाणे) केली होती. तडजोडीअंती २५ हजार रुपये लाच स्वीकारताना सुभद्राला रंगेहाथ सापळा रचून पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणातील तक्रारदार ठेकेदार असून त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रार दाखल केली होती. ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनात पोसई संजीव बंबरगेकर, पोहेकॉ विकास माने, सुनील घोसाळकर, पोना सचिन पाटील, मपोकॉ पुनम पाटील ,चापोहेकॉ विष्णू गुरव यांनी केली.
असे आहे प्रकरण
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार ठेकेदार आहे. मूळ ठेकेदारांनी जलजीवन मिशन योजनेंतर्गत चंदगड तालुक्यातील घुल्लेवाडीमधील नळपाणी पुरवठा योजना सुधारीकरणाचे काम घेतले होते. घुल्लेवाडीमध्ये जलजीवन नळपाणी पुरवठा कामाचे बिल मंजूर केले म्हणून तक्रारदाराकडे मंजूर केलेल्या १२ लाख रुपयांच्या बिलामध्ये उपअभियंता असलेल्या सुभद्रा कांबळेने तीन टक्के दराने ३३ हजार रुपये लाचेची मागणी केली. यानंतर तडजोडीअंती २५ हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते. लाचेची ठरलेली रक्कम तक्रारदाराकडून स्वतः सुभद्रा स्वीकारताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. आरोपी सुभद्रा लक्ष्मणराव कांबळेविरोधात चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.