लासलगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील कांदा व्यापा-याने अपशब्द व्यापरल्याचा निषेध करण्यासाठी विंचूर येथे कांदा व्यापा-यांनी रास्ता रोका करत निषेध व्यक्त केला. जिल्ह्यात सर्वत्र कांदा लिलाव बंद असतांना विंचूर येथे कांदा लिलाव सुरु असल्यामुळे मुंगसेच्या व्यापा-याने अपशब्द वापरले. त्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. त्यानंतर विंचुरच्या व्यापा-यांनी हा पवित्रा घेतला. त्यांच्याबरोबर शेतकरी आंदोलनात उतरले.
गेल्या १३ दिवसापासून जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यामध्ये कांदा लिलावामध्ये सहभाग न घेण्याचा कांदा व्यापा-यांनी निर्णय घेऊन संप पुकारला आहे. त्यात विंचुर येथे मात्र कांदा व्यापा-यांनी लिलाव सुरु ठेवल्यामुळे व्यापा-यांचे एकतेत फुट पडली आहे. त्याचेच पडसाद आज येथे उमटले. मुंगसे या बाजार समितीतील या कांदा व्यापाऱ्याच्या ऑडिओ क्लीपमध्ये त्याने लिलाव सुरु ठेवणा-या व्यापा-यांबरोबरच काही नेत्यांनी अपशब्द वापरल्याचे बोलले जात आहे.
विंचूरच्या कांदा व्यापाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी हे आंदोलन नाशिक- छत्रपती संभाजी महामार्गावर विंचूर उपबाजार समिती समोर केले. यावेळी शिवीगाळ व अपशब्द वापरणाऱ्या व्यापाराचा निषेध करत रस्ता रोको आंदोलन केले. अखेर कारवाईचे आश्वासन मिळाल्या नंतर पुन्हा कांदा लिलाव सुरू झाले