नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिल्यामुळे आज कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले. जोपर्यंत सरकार निर्यात शुल्क आणि आमच्या मागण्यांवर चर्चा करत नाही, तोपर्यंत बाजार समित्या बंदच राहतील असा इशारा नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनने केंद्र सरकारला दिला आहे. यावेळी त्यांनी लिलाव प्रक्रियेत व्यापारी सहभागी होणार नसल्याचेही सांगितले.
जिल्हयातील लासलगावसह १७ बाजार समितीमध्ये कांदा लिलावात आजपासून व्यापारी सहभागी झाले नाही. त्यामुळे आज सकाळपासून बाजार समित्यामध्ये शेतकऱ्यांनीही कांदा विक्रीस आणला नाही. व्यापारी लिलावमध्ये सहभागी होत नाही, शेतकरी आले नाही. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट आहे. या बंदमुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
या बेमुदत संपाबाबत बोलतांना व्यापा-यांनी सांगितले की, सरकारने दिलेलं आश्वासन अद्यापही पाळलेलं नाही. या प्रश्नावर तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून व्यापारी वर्ग दयनीय अवस्थेत असून मुख्यमंत्री आणि पणन मंत्री यांना पत्रव्यवहार केला असून त्यांनी चर्चा करावी, अन्यथा आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत असे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने लावलेले ४० टक्के निर्यात शुल्क तात्काळ कमी करण्याची प्रमुख मागणी असून इतरही मागण्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.