इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
जालना : मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विविध जागी होणाऱ्या सभा आणि त्यांना होणारी गर्दी चर्चेचा विषय ठरत आहेत. जरांगे पाटील यांना ऐकायला, मराठा आरक्षणाची भूमिका समजून घ्यायला मोठ्या संख्येने लोक येत असून या सभांचे भव्यदिव्य आयोजन अनेकांसाठी आश्चर्याचा भाग बनला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या सभांचा खर्च कोण करतोय, हा एकच सवाल सध्या विचारण्यात येत आहे.
मराठा आरक्षणासाठी जालनातील अंतरवाली सराटी इथून राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी गावात जय्यत तयारी सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी उपोषण केले होते. जरांगे पाटलांच्या या उपोषणाला समाजाची मोठी साथ मिळाली. त्यातूनच पुन्हा एकदा मराठा आंदोलन राज्यभरात उभे राहिले. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घेण्यासाठी सरकारच्या नाकीनऊ आले. सरकारने जीआर काढला, खुद्द मुख्यमंत्री शिंदे जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्यासाठी अंतरवाली सराटी गावात पोहचले होते. या उपोषणानंतर जरांगे पाटील राज्यभरात दौरा काढत आहेत. ठिकठिकाणी जरांग पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. त्यात १४ ऑक्टोबरला होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
१०० एकर जागा, ५० जेसीबी
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी सुरू असून, युद्धपातळीवर सभेच्या ठिकाणी कामे सुरू आहेत. सभास्थळी १० फूट उंच स्टेज सभेसाठी उभारण्यात येणार आहे. बीडमधून अंतरवाली सराटी येथे ५० जेसीबी पोहचले आहेत. जरांगेच्या सभेसाठी जवळपास १०० एकर जागा निश्चित होती. परंतु एवढी जागा अपुरी पडेल या दृष्टिकोनातून परिसरातील आणखी जागा साफ करण्यासाठी बीड जिल्ह्यातून पन्नास जेसीबी मागवण्यात आले. मराठा समाज बांधव लोक वर्गणी आणि सहभाग घेत सभेसाठी आपले योगदान देत असल्यामुळे हा खर्च कोण करतो या प्रश्नालाही संयोजकांनी उत्तर दिले आहे.
150 acres of land… Manoj Jarange announced Sabha