जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या १६ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांचे सुरु असलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगे पटील यांच्याशी १५ मिनिटे चर्चा केली. त्यानंतर जरांगे पाटील यांना ज्यूस पाजले आणि आणि त्यांनी उपोषण सोडले. यावेळी मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर विश्वास ठेव. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी मागे हटणार नाही, असे आश्वासन दिले. त्यानंतर जास्त आढेवेढे न घेता उपोषण मागे घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला ४० दिवसाचा वेळ दिल्याचेही सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील, मंत्री गिरीश महाजन, अतूल सावेही यावेळी उपस्थितीत होते. तर उपोषण स्थळी मंत्री संदीपान भुमरे आणि माजी आमदार अर्जुन खोतकर आधीच पोहोचले होते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. तर याच पार्श्वभूमीवर सरकारने मराठा आरक्षणाचा तोडगा सोडवण्यासाठी एक महिन्याचा वेळ जरांगे यांच्याकडे मागितला होता. त्यामुळे जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा वेळ दिला असून, उपोषण मात्र कायम असणार असल्याचे सांगितले होते. तसेच आपले आमरण उपोषण मुख्यमंत्री यांच्या हस्ते सोडणार असल्याचे सांगितले होते.
या मागणीनंतर आज मुख्यमंत्री अंतरवाली गावात पोहोचले आहे. त्यानंतर जरांगे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, रद्द झालेले आरक्षण आपल्याला पुन्हा मिळायला पाहिजे ही सरकारची भूमिका असल्याचे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सरकारची भूमिका स्पष्ट आहे. यापूर्वीही सरकारने मराठा समाजाला १६ आणि १७ टक्के आरक्षण दिले होते. अध्यादेश काढला होता. पण, कोर्टाने स्थगिती दिली. त्यानंतर आपण कायदा केला. सरकारने १२ ते १३ टक्के कन्फर्म केला. पण दुर्देवाने सर्वोच्च न्यायालयात हा कायदा टिकला नाही. तो का टिकला नाही, हे मनोजलाही माहीत आहे. त्यावर मी बोलणार नाही. पण आरक्षण देण्याची भूमिका आहे.
आरक्षण रद्द झाले तेव्हा ३७०० मुलांच्या मुलाखती झाल्या होत्या. नोकऱ्या मिळत नव्हत्या. त्यांना नोकऱ्या देण्याचे धाडस कोणी करत नव्हते. पण मी त्यांना नोकऱ्या दिल्या. जे काही होईल त्याला सामोरे जावू असे ठरवले. ते मुले आजही नोकरीत आहेत. इतरही सुविधा दिल्या, असेही ते म्हणाले.
Manoj Jarange, who has been on hunger strike for 16 days for Maratha reservation, ends his hunger strike
https://x.com/mieknathshinde/status/1702197867895730551?s=20