जालना (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठा आरक्षणासाठी १५ दिवसापासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची आज सांयकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठा आरक्षणासाठी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटी गावात भेट घेणार आहे. सांयाकळी ५ वाजता हे नेते जालन्यात पोहोचणार आहे. या भेटीत काय चर्चा होते. त्यानंतर जरांगे पाटील काय निर्णय़ घेतात हे महत्त्वाचे आहे.
काल सरकारचे शिष्टमंडळ भेटण्यासाठी आल्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी आपण उपोषण सोडले तरी उपोषणस्थळी तळ ठोकून राहू. आंदोलन सुरुच राहील असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारपुढे पाच अटी ठेवल्या होत्या. त्या पाच अटी सरकारने मान्य कराव्यात, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी आपले उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सर्व मंत्रिमंडळ, खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना बोलावले होते. हे सर्वजण आले तर आपण उपोषण सोडू, असेही ते म्हणाले होते. त्यांच्या या मागणीला साद घालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठा आरक्षणासाठी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जाणार आहे.
Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Ajit Pawar in Jalna today; Manoj Jarange Patil will meet at the place of hunger strike