जळगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपुडा पर्वतरांगात बसलेलं अतिदुर्गम असं आंबापाणी (ता.यावल) गावं….या गावातील आरोग्य , शिक्षण व मुलभूत सुविधा जाणून घेण्याची जिज्ञासा….यासाठी गावातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी थोडी – थोडकी नव्हे तर तब्बल २० किलोमीटरची पायपीट करत पोहोचणारे जळगाव जिल्ह्याचे पहिले जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे ठरले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांसोबतच तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनीही पायपीट केली. त्यामुळे दुर्गम आंबापाणी गावात पायपीट करत पोचणाऱ्या त्या पहिल्या महिला तहसीलदार ठरल्या आहेत. आंबापाणीला जाण्यासाठी हरीपुरा गावापासून पायी चालत प्रवास करावा लागतो, परतीचा प्रवास करुन हे अंतर सुमारे २० किलोमीटर होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मनाचा निर्धार करत हरीपुरापासून चक्क पायपीट प्रवास करत आंबापाणी गाठले.
आंबापाणीला पोहचल्यावर त्यांनी मतदार यादीतील नोंदणीविषयी माहिती घेतली, मतदान केंद्राला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. चोपडा मतदारसंघातील हे जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकमेव कच्चे मतदान केंद्र आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे शाळेचे आणि अंगणवाडीचे पक्के बांधकाम करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. महिला मतदारांची संख्या कमी असल्यामुळे कारणांचा शोध घेवून त्यांची नोंदणी वाढविण्यात यावी. मयत मतदारांची नावे देखील तत्काळ कमी करण्यात यावेत. मतदान केंद्रावर मतदान पथकातील टीम आणि मतदान साहित्य पोहोचविण्यासाठी वाहतूक आराखडा योग्य पद्धतीने नियोजन करण्यात यावे. मतदार केंद्रावर ड्रोनद्वारे नियंत्रण ठेवण्यात यावे. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व लोकांनी मतदान करण्याचे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना यावेळी केले.
जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देऊन शैक्षणिक स्थितीबद्दल माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी शिक्षकांना दिल्या. ग्रामस्थांनी त्यांची कला, संस्कृती, परंपरा, शिक्षण, उपजिविका, दैनंदिनी अडचणींबद्दल जिल्हाधिकाऱ्यांची यावेळी संवाद साधला. याप्रसंगी यावल निवासी नायब तहसीलदार, निवडणूक तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांची उपस्थिती होती.
आंबापाणी गावाचा सर्वांगीण विकास होण्याकरिता तीन सूत्री कार्यक्रम करण्याबाबत सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या आहेत*
१. आंबापाणी या गावाला महसुली गावाचा दर्जा देण्यासाठी प्रस्ताव तयार करावा. त्यानंतर या गावाला ‘एलजीडी कोड’ देण्यात येईल. यामुळे सदर गाव शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र होईल. सदर गावाचा गावठाण बाबतचा प्रस्ताव मार्गी लावण्यात येईल.
२. गावातील व्यक्तींना शंभर टक्के जातीचे दाखले आणि जन्म प्रमाणपत्र तसेच आधार कार्ड याबाबत कॅम्प घेऊन काम करण्यात येईल. गावात गर्भवती महिला व नवजात बालके यांचे लसीकरण व आरोग्य विषयक सुविधा यांकरिता लसीकरण शिबिर व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येईल.
३) गावात रोजगार हमी योजनेतून रस्त्यांचे कामकाज करण्यात येईल. शेत जमीन सपाटीकरण व फळपीक लागवड या विषयांवर काम करण्यात येईल. आदिवासी विकास विभागामार्फत शबरी घरकुल योजना प्रस्तावित करण्यात येईल.
He became the first collector to walk 20 kilometers to the remote village.