जामनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वंशाला दिवा हवा, या खुळचट समजुतीतून आठ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखूचा गोळा टाकून बापानेचे खून केल्याची संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील हरिनगर तांडा येथे रविवारी उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर, सैतान झालेल्या बापाने मृतदेहाची परस्पर विल्हेवाटही लावली होती. आशा कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे.
वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात २ सप्टेंबर रोजी बुलीबाई गोकुळ जाधव या महिलेची प्रसूती होऊन तिसरी मुलगी झाली. प्रसूतीनंतर दुसऱ्याच दिवशी सुट्टी होऊन बाळासह जाधव कुटुंब हरीनगर तांडा या आपल्या गावी गेले. आशा सेविका मंगला जाधव यांनी दप्तरी जन्माची नोंद केली. मात्र १० सप्टेंबर रोजी बालिकेचा मृत्यू झाल्याचे कळाले. सुदृढ बालकांसाठी साधारणतः २५०० ग्रॅम वजन आवश्यक असते. जाधव यांच्या मुलीचे वजन २६०० ग्रॅम होते. तरीही तिचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांना संशय आला. तर आशा सेविका या नवजात अर्भकांच्या जन्माची नोंद घेण्यासाठी गोकुळच्या घरी गेल्या, त्यावेळी चिमुरडी तिथे नव्हती.
आशा सेविकेने ही माहिती वरिष्ठांना कळवली. वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत हे मंगळवारी गावात पोहोचले. त्यांना सुरुवातीला चिमुरडीच्या आजारपणाने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. डॉ. कुमावत यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी तिसरी मुलगी झाली म्हणून ८ दिवसांच्या मुलीच्या तोंडात तंबाखूचा गोळा टाकून ठार मारल्याची कबुली हरीनगर तांडा येथील निर्दयी बापाने दिली. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून पहूर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
The father was killed by putting a tobacco ball in the mouth of an eight-day-old girl