इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – जागतिक मंदी आली की सर्वांत पहिले आयटी सेक्टरवर परिणाम होतो. आयटी क्षेत्रातील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात होत असते. या आर्थिक वर्षात आतापर्यंत तीन मोठ्या आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना नारळ दिले गेल्याची माहिती पुढे आल्याने पुन्हा एकदा आयटी क्षेत्रातील कर्मचारी वर्गाला धडकी भरली आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांनी एकत्रितपणे दुसऱ्या तिमाहीत १६ हजार १६२ कर्मचाऱ्यांची घट नोंदवली आहे.
आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत भारतातील पहिल्या तीन आयटी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. कंपन्या नोकर कपात करूनही भरपाई देत नाहीत. तसेच नव्या फ्रेशर्सना कामावर घेत आहेत. मागणीत घट झाल्यामुळे कंपन्या नवीन कर्मचाऱ्यांची भरती करीत नाहीत. नोकरी जॉबस्पीक निर्देशांकानुसार, यंदा नऊ महिन्यांत आयटी क्षेत्रातील नोकर भरतीत घट दिसून आली आहे. नवीन कार्यादेशात होणारी घट आणि अनिश्चित आर्थिक वातावरण यामुळे मागील काही तिमाहींमध्ये कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाणही घटले आहे. सर्वच कंपन्यांमध्ये मनुष्यबळ विभागप्रमुख हे उपलब्ध कर्मचाऱ्यांचा पुरेपूर वापर करण्यावर भर देत आहेत. या कंपन्यांनी नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागा न भरण्याची भूमिका घेतली आहे. या कंपन्यांतून कर्मचारी नोकरी सोडून जाण्याचे प्रमाण मागील वर्षभरात १४ टक्के आहे.
मनुष्यबळात घट
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि एचसीएल टेक यांच्या एकत्रित मनुष्यबळात दुसऱ्या तिमाहीत १६ हजार १६२ एवढी घट झाली. त्यात टीसीएसच्या मनुष्यबळात ६ हजार ३३३ घट झाली असून, मागील पाच वर्षांतील ही सर्वांत मोठी घट आहे. इन्फोसिसच्या मनुष्यबळात ७ हजार ५३० ने घट झाली असून, एचसीएलचे मनुष्यबळ २ हजार २९९ ने कमी झाले आहे.
Recession in the IT sector?