मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नवीन संकल्पना आणि नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाकडून स्टार्टअप धोरण जाहीर करण्यात आले आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांच्या नव कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी सोसायटीमार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. यात विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंत भांडवल मिळणार आहे.
राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्याने नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पुरवणे हे महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे मुख्य उद्दिष्ट्य आहे. ही स्पर्धा तीन टप्प्यात घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात संस्थांची नोंदणी व संस्थास्तरावर संकल्पनांची निवड करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात जिल्हास्तरीय सादरीकरण व संकल्पनांची निवड करण्यात येणार आहे. टप्पा 3 विशेष इन्क्युबेशन प्रोग्रामचा समावेश असेल.
या स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थी व संस्था यांना खालीलप्रमाणे बक्षीसे मिळणार आहेत. तालुकास्तरावर उत्तम ३ विजेत्यांना रोख पारितोषिके, जिल्हास्तरावर सर्वोत्तम १० विजेत्यांना प्रत्येकी रु.१ लाखाचे बीज भांडवल,राज्यस्तरावर सर्वोत्तम १० विजेत्या नद्योजकांना प्रत्येकी रु.५ लाखांचे बीज भांडवल, विशेष इन्क्युबेशन प्रोग्रॅम, शैक्षणिक संस्था आणि जिल्ह्यांना पारितोषिके देण्यात येतील.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता शासनाच्या www.msins.in अथवा www.schemes.msins.in या संकेतस्थळावर जास्तीत जास्त शैक्षणिक संस्था, महविद्यालये यांनी नोंदणी करावी असे आवाहन मुंबई शहरचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रवींद्र सुरवसे यांनी केले.
Maharashtra Student Innovation Challenge: Students will get capital up to Rs.10 lakh