नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर २०२३ या नऊ महिन्यांत भारतात अंतराळ स्टार्टअपमध्ये १,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
नवी दिल्लीतील झी टीव्ही नॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये एका विशेष मुलाखतीदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) विज्ञान आणि तंत्रज्ञान, डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयानंतर, भारताचे अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून उद्योग तसेच खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच ही गुंतवणूक शक्य झाली आहे. चार वर्षांपूर्वी अंतराळ क्षेत्रात फक्त एका स्टार्टअपपासून ते हे क्षेत्र खुले झाल्यानंतर आपल्याकडे जवळपास 190 खाजगी अंतराळ स्टार्टअप्स आहेत आणि पूर्वीचे काही स्टार्टअप्स मालक आता उद्योजक बनले आहेत, असे ते म्हणाले.
२०१४ मध्ये फक्त ३५० स्टार्टअप्स होते, मात्र आज आपल्या देशात युनिकॉर्न्स व्यतिरिक्त सुमारे १,३०,००० स्टार्टअप्स आहेत, असेही त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालबाह्य नियम रद्द केले आणि तंत्रज्ञानाच्या अनुकूल वापराद्वारे नागरिक केंद्रित प्रशासनावर लक्ष केंद्रित केले आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून श्रीहरिकोटाचे दरवाजे सर्व संबंधितांसाठी खुले करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले. “इतकेच नाही तर तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याकडे सरकारचा कल आहे आणि ते सर्व अडथळे किंवा अडथळे आणणारे नियम, जे फारसे सक्षम नव्हते, ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहे,” असे त्यांनी सांगितले. जग भविष्यात एकात्मिक तंत्रज्ञानावर आधारित वाढ अनुभवणार आहे. भारत आता कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञानासह तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडी घेत आहे, असे ते म्हणाले.
1000 crore investment in space startups in India