इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा बिगूल वाजला, भारताने पहिला विजय मिळवला… पण साऱ्यांचे लक्ष लागले आहे ते १४ ऑक्टोबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान या हाय व्होल्टेज सामन्याकडे. या सामन्याच्या वेळी स्टेडियम उडवून देण्याची धमकी मिळाल्यामुळे मात्र सुरक्षाही हाय व्होल्टेज तैनात असणार आहे.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तानात विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा सामना रंगणार आहे. या सामन्याच्या पूर्वीच स्टेडियम उडवून देण्याची धमकी मिळाल्याने वातावरण तापले आहे. मुख्य म्हणजे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतात कुठेही सामना खेळण्यास तयार आहे, मात्र अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळवू नका, अशी विनंती वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी केली होती. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ही विनंती फेटाळून लावली. पाकिस्तानने चेन्नई, हैदराबादसारखे पर्यायही दिले होते. पण, भारताने ते नाकारून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवरच सामना होईल, असे स्पष्ट सांगितले.
आता सामन्याचा दिवस जवळ आला असताना धमकीमुळे अधिकच वातावरण तापले आहे. जवळपास एक लाख लोक त्या दिवशी स्टेडियम आणि परिसरात असतील, असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पोलिसांसह एनएसजीच्या तिन्ही टीम तैनात असणार आहेत. गुजरातचे गृहमंत्री भुपेंद्र पटेल यांनी सामन्याच्या सुरक्षेचा आढावा घेतला असून यात राज्याचे ७ हजार पोलीस स्टेडियमच्या आवारात राहणार असल्याचे सांगितले आहे. याशिवाय एनएसजी, ड्रोनविरोधी, बॉम्बस्क्वाड पथकही असणार आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफही तैनात असणार आहे.
११ वर्षांनंतर सामना
भारतात दोन्ही राष्ट्रांमध्ये ११ वर्षांनंतर सामना होणार आहे. दरम्यानच्या काळात अनेक घटना घडल्या. पाकिस्तानच्या कुरापती सुरू होत्या. भारतानेही सर्जिकल स्ट्राईक करून दणका दिला. अशात आता सामन्याच्या पूर्वीच एक ई-मेल केंद्रीय तपास यंत्रणेला आला असून यामध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला तुरुंगातून सोडावे आणि ५०० कोटी रुपये द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
This is how high voltage security is for India-Pak match… You will also be amazed to read…