इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
युएनएफपीए (युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड) इंडिया ने, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस (आयआयपीएस), अर्थात आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या सहयोगाने, भारतामधील ज्येष्ठ (वृद्ध) नागरिकांबाबतचा बहुप्रतिक्षित अहवाल, “इंडिया एजिंग रिपोर्ट २०२३” प्रकाशित केला आहे. भारतामधील वृद्धांच्या लोकसंख्येत हळूहळू वाढ होत असताना, हा अहवाल ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याशी निगडीत आव्हाने, संधी आणि संस्थात्मक प्रतिसाद यावर प्रकाश टाकतो.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव सौरभ गर्ग आणि युएनएफपीए च्या भारतातील प्रतिनिधी आणि भूतान मधील संचालक अँड्रिया एम. वोजनर यांनी एकत्रितपणे हा अहवाल प्रकाशित केला. इंडिया एजिंग रिपोर्ट २०२३ मध्ये भारतातील वृद्ध व्यक्तींचे राहणीमान आणि कल्याणाबाबत सखोल आढावा घेण्यात आला आहे. एक अद्ययावत दृष्टीकोन प्रदान करण्यासाठी, हा अहवाल लॉगीट्युडीनल एजिंग सर्व्हे इन इंडिया (LASI), २०१७–१८, भारतीय जनगणना, भारत सरकारचा लोकसंख्या अंदाज (२०११-२०३६) आणि संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवहार विभागाद्वारे जारी करण्यात आलेल्या जागतिक लोकसंख्या अंदाज २०२२ द्वारे उपलब्ध करण्यात आलेल्या ताज्या डेटा वर आधारित आहे.
“भारतीय लोकसंख्या वृद्धत्वाकडे झुकत असताना, आपल्या वृद्ध लोकसंख्येला निरोगी, सन्मानपूर्ण आणि आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेली काळजी आणि आधार मिळेल, याची खात्री करणे अत्यावश्यक आहे,” भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे सचिव सौरभ गर्ग यांनी सांगितले. “इंडिया एजिंग रिपोर्ट २०२३, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक बहुमोल पथदर्शक आराखडा प्रदान करत असून, त्याच्या शिफारसी लागू करण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्र येऊन काम करावे, असे मी आवाहन करतो.” ते म्हणाले.
युएनएफपीए च्या भारतातील प्रतिनिधी आणि भूतान मधील संचालक अँड्रिया एम. वोजनर म्हणाल्या, “हा सर्वसमावेशक अहवाल विद्वान, धोरणकर्ते, कार्यक्रम व्यवस्थापक आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याशी निगडीत असलेल्या सर्व भागधारकांसाठी एक मोलाचे साधन आहे. वृद्ध व्यक्तींनी समाजासाठी महत्वाचे योगदान दिले असून, त्यांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठीचे आपले सर्वोत्तम परिश्रम, हा त्यांचा हक्क आहे.”
अहवालाच्या मुख्य निष्कर्षांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाशी संबंधित पुढील निरीक्षणांचा समावेश आहे:
- ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी जेरियाट्रिक (वृद्ध/ज्येष्ठ नागरिक) सेवांमध्ये वाढ करणे.
- ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सेवा, आर्थिक सक्षमीकरण आणि क्षमता विकासाबाबतच्या गरजा पूर्ण करणाऱ्या विविध सरकारी योजना आणि धोरणे.
- संगणक आणि इंटरनेट वापराबाबतची सत्रे याद्वारे डिजिटल सक्षमीकरणामध्ये सक्रियपणे कार्यरत वस्ती पातळीवरील संस्था.
- ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाबाबत धोरणे आखण्यासाठी समर्पित मंत्री-स्तरीय समित्या.
- आनंददायी वृद्धत्व, सामाजिक सहाय्य, वृद्धाश्रम आणि ज्येष्ठ नागरिकांवर होणार्या अत्याचारांबाबत जनजागृती अभियानांसाठी कॉर्पोरेट स्तरावरील प्रयत्न.
- इंडिया एजिंग रिपोर्ट २०२३ पाहण्यासाठी पुढील संकेतस्थळाला भेट द्या: https://india.unfpa.org/en
India Ageing Report 2023 Unveils Critical Insights into Elderly Care in India