इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते गुजरातमध्ये गौतम अदानींच्या पॉवरप्लांटचे उदघाटन संपन्न झाल्यानंतर राजकीय चर्चेलाही मोठे उधाण आले आहे. या उदघाटनाचा फोटो शरद पवारांनी ट्विट केला. गुजरातमध्ये गौतम अदानींनी नवा पॉवरप्लँट सुरू केला आहे. याच पॉवरप्लांटचं उदघाटन शरद पवारांनी केले. शरद पवारांनी ट्विटमध्ये श्री गौतम अदानी यांच्यासमवेत वसना, चाचरवाडी, गुजरात येथे भारतातील पहिल्या लॅक्टोफेरिन प्लांट एक्झिमपॉवरचे उद्घाटन करणे हा बहुमान होता असे म्हटले आहे. या भेटीत या दोघांमध्ये पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी वारंवार गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांच्या संबंधावर टीका करत असतांना ही भेट राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे. याअगोदही शरद पवार आणि गौतम अदाणी यांची दोनदा भेट झाली होती. हिंडनबर्गच्या अहवालानंतर २० एप्रिल २०२३ ला अदाणी यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली होती. तर, दुसरी भेट २ जून २०२३ मध्ये झाली आहे. ही काही नवीन गोष्ट नाही. पण, यावेळी थेट गुजरातमध्ये जाऊन शरद पवार यांनी त्यांच्या पॉवरप्लांटचं उदघाटन केल्यामुळे ही भेट चर्चेत आली आहे.
शरद पवार हे इंडिया आघाडीतील प्रमुख नेते आहे. त्यामुळे या आघाडीतील एक घटक पक्ष अडाणी यांना टोकाचा विरोध करत असतांना ही भेट झाल्यामुळे काँग्रेस काय प्रतिक्रीया देते हे महत्त्वाचे आहे. दरम्यान या भेटीनंतर वंचित बहुजन आघाडीने जोरदार टीका केली आहे. ट्विट करत म्हटले आहे की, राष्ट्रवादी ही भाजपची बी-टीम आहे का ? प्रिय काँग्रेस, तुमच्या आवडत्या मित्राबद्दल तुमचे काय म्हणणे आहे ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
या भेटीवर रोहित पवार म्हणाले, शरद पवार अदाणी आणि अंबानी यांची भेट घेतात. छोट्या व्यावसायिकांनाही भेटतात. आपल्या देशाचा विकास कसा करता येईल ? याबाबत सगळ्यांमध्ये चर्चा होत असते. त्यावर पॉलिसी करत असतात. सगळ्या घटकांना भेटल्याशिवाय पॉलिसी करता येत नाही.
Sharad Pawar inaugurated Gautam Adani’s plant in Gujarat