नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एनटीपीसी या भारताच्या आघाडीच्या एकात्मिक उर्जा निर्मिती कंपनीच्या पूर्णपणे मालकीची असलेली एनटीपीसी ग्रीन एनर्जी (एनजीईएल) ही कंपनी आणि आधुनिक जगतातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील नायरा ही आंतरराष्ट्रीय उर्जा निर्मिती कंपनी यांनी आज एक सामंजस्य करार (एमओयु) केला आहे. हरित हायड्रोजन आणि हरित उर्जा क्षेत्रातील संधींचा शोध घेण्याच्या उद्देशाने हा करार करण्यात आला आहे.
या एमओयु अन्वये नायरा एनर्जी आपल्या वापरासाठी हरित हायड्रोजनची निर्मिती करणे, निःकार्बनीकरण प्रक्रीयेला वेग देणे तसेच कार्बन उत्सर्जन प्रमाण कमी करण्यासाठी मदत करणे इत्यादी कार्यांमध्ये सहयोगी संबंध प्रस्थापित करण्याची योजना आखण्यात आली आहे. हे सहयोगी संबंध भारतात हायड्रोजनसंबंधी प्रकल्प विकसित करण्याच्या एनटीपीसीच्या उपक्रमाच्या अनुषंगाने स्थापण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला अनुसरून आहेत.
एनजीईएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित भार्गव आणि नायरा एनर्जी कंपनीच्या तांत्रिक विभागाचे प्रमुख अमर कुमार यांच्यासह एनटीपीसी, एनजीईएल तसेच नायरा एनर्जी या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी उपस्थित चमूचे अभिनंदन करून एनजीईएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित भार्गव म्हणाले की या भागीदारीमुळे हरित हायड्रोजन निर्मितीसाठीच्या आधुनिक तंत्रज्ञानांचा शोध तसेच अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. भारताच्या स्वच्छ उर्जाविषयक भविष्यात हरित हायड्रोजन हा अत्यंत महत्त्वाचा घटक असणार आहे आणि या भागीदारीसह आम्ही अधिक स्वच्छ आणि अधिक लवचिक उर्जा मानचित्र निर्माण करण्यात योगदान देणाऱ्या हरित हायड्रोजन निर्मितीसाठीच्या आधुनिक तंत्रज्ञानांचा शोध तसेच अंमलबजावणी करू.
हरित हायड्रोजन निर्मितीसाठी एनटीपीसी करत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा करून नायरा एनर्जी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अलॉईस विराग यांनी सांगितले की उर्जा क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या नायरा एनर्जी या कंपनीच्या सर्व व्यापारी कार्यांमध्ये पर्यावरणीय शाश्वततेचे तत्व खोलवर रुजवलेले आहे. हे सहयोगी संबंध देशाची उर्जा स्थित्यंतरविषयक उद्दिष्ट्ये साध्य करण्यात योगदान देतील.
एनटीपीसी ही देशाची सर्वात मोठी उर्जा कंपनी असून या कंपनीची एकूण स्थापित उर्जा क्षमता ७३ गिगावॉटपेक्षा जास्त आहे. नवीकरणीय उर्जेच्या वापराबाबतच्या वाढत्या आग्रहाचा भाग म्हणून या कंपनीच्या अधिपत्याखाली नवीकरणीय उर्जा पार्क्स तसेच हरित हायड्रोजन, उर्जा साठवण तंत्रज्ञान तसेच अहोरात्र नवीकरणीय उर्जा निर्मिती क्षेत्रातील व्यापारासाठीच्या प्रकल्पांसाठी एनजीईएल ही पूर्ण मालकी हक्क असलेली उपकंपनी स्थापन करण्यात आली. वर्ष २०३२ पर्यंत नवीकरणीय उर्जा निर्मिती क्षमता ६० गिगावॉटपर्यंत वाढवण्याची योजना एनटीपीसीने आखली आहे.
नायरा एनर्जी ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील एकात्मिक उर्जा निर्मिती कंपनी असून हायड्रोकार्बनच्या मूल्यसाखळीत तेल शुद्धीकरण ते घाऊक विक्री अशा सर्व आघाड्यांवर कंपनी उत्तम कामगिरी करत आहे. नायरा एनर्जी या कंपनीकडे गुजरातमधील वडिनार येथील २० एमएमटीपीए क्षमतेच्या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या एकाच स्थानी असणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची मालकी आहे. हा प्रकल्प जगातील सर्वात आधुनिक आणि गुंतागुंतीच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पांपैकी एक असून त्याची क्लिष्टता ११.८ म्हणजे जगातील सर्वाधिक क्लिष्टता असलेल्या प्रकल्पांपैकी एक आहे. भारतभरात या कंपनीची ६ हजारा हून अधिक कार्यान्वित किरकोळ विक्री केंद्रे आहेत.
MoU with this international company for production of green hydrogen