गोवा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दरवर्षी सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस साजरा केला जातो. या दिवसानिमित्त आज भारतीय तटरक्षक दलाच्या नेतृत्वाखाली एक उपक्रम राबवण्यात आला. तटरक्षक दल जिल्हा मुख्यालय क्रमांक 11, गोवा यांच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय तटरक्षक जहाज (ICGS) सुजीतने, गोव्यातील सीएसआयआर -राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्था, ओशन सोसायटी ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय ध्रुवीय महासागर संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गोव्यातील मिरामार आणि कोलवा दोन्ही किनाऱ्यांवर व्यापक स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले. केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग तसेच पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक हे मिरामार येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर गोव्याचे आमदार व्हेंझी व्हिएगस कोलवा येथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
स्वच्छता मोहीम, सकाळी लवकर सुरू झाली. या मोहिमेत असंख्य स्वयंसेवक सहभागी झाले होते. सौहार्द आणि समर्पणाची भावना वृद्धिंगत करण्यासाठी, सर्व सहभागींना टी-शर्ट आणि अल्पोपहार देण्यात आला. मिरामार किनाऱ्याचे मुळचे निसर्गसौंदर्य पुन्हा बहाल करण्याच्या प्रयत्नात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हेदेखील स्वयंसेवकांसोबत सहभागी झाले. या महत्त्वपूर्ण पर्यावरणीय उपक्रमाच्या आयोजनाबद्दल भारतीय तटरक्षक दलाच्या समर्पित प्रयत्नांचे श्रीपाद नाईक यांनी कौतुक केले. विद्यार्थी, भविष्यातील जबाबदार नागरिक असल्याचे सांगून नाईक यांनी किनारपट्टी परिसंस्थेच्या संरक्षणात सक्रिय सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
स्वच्छतेसाठी देशाच्या वचनबद्धतेचे स्मरण नाईक यांनी करून दिले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना केलेल्या कळकळीच्या आवाहनाचा उल्लेख त्यांनी केला. स्वच्छता मोहिमेबद्दल नागरिकांमध्ये जबाबदारीची भावना वाढली असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि सरकारी कार्यक्रमांच्या यशात लोकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाची भूमिका बजावतो यावर भर दिला. राष्ट्राच्या समृद्धीमध्ये अशा छोट्या पण प्रभावी कृतींचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या प्रगतीचे श्रेय स्वच्छ आणि हरित पर्यावरणासाठी सामूहिक प्रयत्नांना देत अर्थव्यवस्थेसह विविध क्षेत्रातील भारताच्या प्रगतीकडे त्यांनी लक्ष वेधले.
नाईक यांनी आजच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व संस्थांचे आभार मानल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली. पर्यावरण आणि संपूर्ण राष्ट्राच्या अधिक प्रगतीसाठी सतत सहकार्याच्या महत्त्वावर जोर देऊन त्यांनी या संस्थांना भविष्यातील प्रयत्नांमध्ये यश मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या.
Goa’s sea coast became clean; This initiative was implemented under the leadership of the Indian Coast Guard