नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने, आर्थिक वर्ष २०२३-२४ ते २०२५-२६ या तीन वर्षांत ७५ लाख एलपीजी कनेक्शन प्रदान करण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा (PMUY) कालावधी वाढवण्याला मान्यता दिली आहे. तीन वर्षात एकूण १६५० कोटी रुपये मूल्याच्या ७५ लाख एलपीजी (स्वयंपाकाचा गॅस) जोडण्या जारी करणार.
पुढील दराने जोडणी प्रदान केली जाणार:
१४.२ किलो एकल जोडणी- रु.२२०० प्रति जोडणी
५ किलो दुहेरी जोडणी= रु.२२०० प्रति जोडणी
५ किलो एकल जोडणी- रु. १३०० प्रति जोडणी
उज्ज्वला २.० च्या सध्याच्या पद्धतीनुसार, उज्ज्वला लाभार्थ्यांना पहिले रिफिल आणि शेगडी देखील विनामूल्य दिली जाईल.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) ग्राहकांना प्रति वर्ष १४.२ किलो एलपीजी सिलेंडरच्या १२ रिफिलपर्यंतसाठी प्रति सिलिंडर २०० रुपयांचे निर्धारित अनुदान दिले जात आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) चालू ठेवल्याशिवाय, पात्र गरीब कुटुंबांना योजनेत अंतर्भूत असलेले अंतर्गत योग्य लाभ मिळू शकणार नाही.
एलपीजी कनेक्शनमुळे गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन उपलब्ध होईल आणि स्वयंपाकाच्या इंधनाचे पारंपारिक स्रोत जसे की जळाऊ लाकूड, कोळसा, गोवऱ्या इत्यादींच्या वापरामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर मात करण्यास मदत होईल. यामुळे महिलांची क्रयशक्ती आणि पर्यायाने उत्पादकता वाढेल तसेच लाकूड फाटा गोळा करण्यासंबंधित कष्ट दूर झाल्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावेल आणि काही वेळा स्वयंपाकाच्या इंधनाच्या अनुपलब्धतेमुळे वाटणारी असुरक्षितता दूर होईल.
काही पात्र कुटुंबांकडे अजूनही एलपीजी जोडणी नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात, उदाहरणार्थ – वाढती लोकसंख्या, विवाह, स्थलांतर, कुटुंबांचे विभक्त होणे, अत्यंत दुर्गम ठिकाणे इत्यादींचा परिणाम म्हणून दरवर्षी नवीन कुटुंबे तयार होत आहेत. ३१.०८ २०२३ पर्यंत १५ लाख प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) कनेक्शनची मागणी आहे.
75 lakh gas connections worth Rs 1650 crore will be given