पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने पुणे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात ९ ठिकाणी विविध छापे टाकून ८ लाख ५७ हजार ३५५ रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी आदींचा साठा जप्त करण्यात आला असून पदार्थ साठवणूक करणाऱ्या आस्थापना सील व वाहतूक करणारे एक वाहन जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.
गेल्या तीन दिवसात पुणे विभागात ३८ ठिकाणी विविध छापे टाकुन ९ लाख ३२ हजार ३८२ रुपये किमतीचा प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात ८ आस्थापना सिल करण्यात आल्या असून ९ गुन्हे दाखल केले आहेत. पुणे विभागात ३६ आस्थापना सिल करण्यात आल्या असून २४ गुन्हे दाखल केले आहेत.
नागरिकांचे जनहित व जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून १८ जुलै २०२३ च्या आदेशानुसार राज्यात गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाकु, सुगंधित सुपारी इत्यादी तंबाखु जन्य पदार्थावर उत्पादक, साठा, वितरण व विक्री यावर १ वर्षाकरिता बंदी घातलेली आहे.
प्रतिबंधीत गुटखा, पान मसाला इत्यादीच्या विक्रीबाबतची माहिती असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधण्याचे आवाहन सह आयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी केले आहे.