इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – हिंदुस्तान पेट्रोलियम कोर्पोरेशन (एचपीसीएल) ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सार्वजनिक उपक्रम कंपनी पंजाबात भटिंडा येथे १४०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा सेकंड जनरेशन(2जी) बायो रिफायनरी कारखाना उभारत आहे. या कारखान्यामध्ये भाताच्या पेंढ्याचा वापर करून केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाअंतर्गत पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठी लागणाऱ्या इथेनॉलचे उत्पादन करण्यात येणार आहे. एनसीआर आणि लगतच्या परिसरातील हवेच्या दर्जाचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमण्यात आलेला आयोग (सीएक्यूएम) देखील या कारखान्याच्या उभारणी कार्याच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच भटिंडा येथील कारखाना परिसराला भेट दिली आणि एचपीसीएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक आणि भटिंडा जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांसह येथील कार्याचा आढावा घेतला.
या 2जी इथेनॉल कारखान्याची निर्धारित उत्पादन क्षमता १०० किलोलीटर प्रतिदिन आहे आणि जेव्हा हा कारखाना संपूर्ण क्षमतेने कार्यरत होईल तेव्हा तेथे एका दिवसात ५७० टन पेंढा (एका वर्षात २ लाख टन) पेंढा वापरला जाणार आहे. या २ जी इथेनॉल उत्पादन कारखान्यासाठी या हंगामात, सुमारे १ लाख टन पेंढा खरेदी करण्यात येणार आहे. या वर्षाच्या शेवटाला हा कारखाना पूर्णपणे कार्यरत होईल असा अंदाज आहे.
या कारखान्यातर्फे यापूर्वीच पेंढा खरेदीला सुरुवात झाली असून काही दिवसांतच येथे खरेदी प्रक्रिया अधिक वेगाने सुरु होईल. खरेदी प्रक्रीयेतील अडथळे दूर करून ही प्रक्रिया सुरळीतपणे सुरु राहण्याच्या दृष्टीने एचपीसीएल कंपनी व्यवस्थापन पंजाब राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि पंजाब उर्जा विकास संस्था (पीईडीए)यांच्याशी समन्वय साधत आहे. पेंढा खरेदीसाठी भटिंडा आणि लगतच्या परिसरातील स्वयं सहाय्यता बचत गटांशी करार करण्यात आले आहेत. तर २३ हजार टनांहून अधिक पेंढा याआधीच जमवण्यात आला आहे.
हा कारखाना यावर्षी तसेच येणाऱ्या काळात पंजाबातील विशेषतः भटिंडा जिल्ह्यातील भातशेतामध्ये असलेल्या पेंढ्याला आग लागण्याचे प्रमाण कमी करेल. सदर उपक्रमाचा परिणाम आधीच दिसू लागला असून, यावर्षी १५ सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत भटिंडा भागातील भाताच्या पेंढ्यांना आग लागण्याच्या केवळ २९४ घटनांची नोंद झाली आहे. वर्ष २०२२ मध्ये अशा ८८० घटना नोंदल्या गेल्या होत्या.
A factory of ethanol using rice straw is being set up in this city at a cost of 1400 crores