मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यंत्र अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील औद्योगिक अभियांत्रिकी आणि गुणवत्ता नियंत्रण (Industrial Engineering & Quality Control) या विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे नि:शुल्कपणे पुनर्गुणमूल्यांकन करण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाला देण्यात आले होते. त्यानुसार मंडळांनी राबविलेल्या पुनर्गुणमूल्यांकन प्रक्रियेत ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या पदविका अभ्यासक्रमाच्या उन्हाळी परीक्षा-२०२३ चा निकाल २९ जून २०२३ रोजी जाहीर करण्यात आला होता. अंतिम वर्ष यंत्र अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील औद्योगिक अभियांत्रिकी आणि गुणवत्ता नियंत्रण या विषयात अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची निवेदने महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळास प्राप्त झाली होती.
या विद्यार्थ्यांच्या प्राप्त निवेदनांच्या अनुषंगाने उत्तरपत्रिकेचे पुनर्गुणमूल्यांकन नि:शुल्कपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ७ ते १० सप्टेंबर २०२३ या कालावधीत उत्तरपत्रिकेचे पुनर्गुणमूल्यांकन करण्यात आले. या प्रक्रियेत ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका मंडळाकडून नव्याने निर्गमित करण्यात येतील, असेही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
71 students who had failed engineering passed after revaluation