पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केडगाव येथे महावितरण कंपनीच्या अधिका-यांनी ड्रोनच्या सहाय्याने एका कंपनीची वीज चोरी पकडली आहे. बंद केलेल्या मीटरला बायपास करुन उच्चदाबाच्या रोहित्राला थेट मोठी केबल जोडून ही वीजचोरी करण्यात येत होती. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही वीज चोरी करणा-या कंपनीचे मालक मुकेश अगरवाल यांना २ कोटी ४ लाखांचा दंड ठोठावला आहे. महावितरणने पकडलेल्या या वीजचोरीमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
या संपूर्ण प्रकरणाबाबत मिळालेली माहिती अशी की, केडगावचे कार्यकारी अभियंता संदीप दरवडे यांना महावितरणने वीजपुरवठा बंद केलेला असतानाही अतिउच्चदाब रोहित्रातून थेट वीजपुरवठा सुरू केल्याची माहिती मिळाली. पण, या कंपनीच्या गेटवर बंदोबस्त लावून आत जाण्यास मज्जाव केला. त्यानंतर दरवडे यांनी ही माहिती मुख्य अभियंता सुनिल पावडे यांच्या कानावर घातली. तेव्हा मुख्य अभियंता पावडे यांनी वीजचोरी उघडकीस आणण्यासाठी ड्रोनची मदत घेण्यास सांगितले. त्यानंतर ऑपरेशन ड्रोन सुरु झाले व ही वीजचोरी पकडली गेली. या वीज चोरी प्रकरणी कार्यकारी अभियंता संदीप दरवडे यांच्या फिर्यादीवरुन शिक्रापूर पोलीस ठाण्यात वीजचोरीचा आणि वीज यंत्रणेस छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा झाला वीजचोरीचा पर्दाफाश
कुरिअर पार्सल देण्याच्या निमित्ताने एका दुचाकीवरुन दरवडे यांनी एका मित्राबरोबर आत प्रवेश केला. त्यानंतर पुराव्यासाठी ड्रोनद्वारे चित्रिकरण सुरु केले. त्यानंतर बाहेर दबा धरुन बसलेल्या टीमने ओळखपत्र दाखवून आत प्रवेश केला आणि वीजचोरीचा पर्दाफाश झाला.
कोण आहे मुकेश अग्रवाल
सणसवाडी येथे पुणे येथील मुकेश ओमप्रकाश अग्रवाल यांच्या मालकीच्या तीन वेगवेगळ्या कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्या एकाच आवारात व शेजारी-शेजारी आहेत. यातील मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि या ग्राहक जोडणीचा वीजपुरवठा थकबाकीमुळे कायमस्वरूपी बंद केला होता. तर इतर दोन वीजजोडण्यांचा वीजपुरवठा देखील थकबाकीच्या कारणास्तव तात्पुरता बंदच होता. तरी ही वीजचोरी करण्यात आली.
मालकाला दिले २ कोटी ४ लाखाचे बिल
मे. प्रकाश करुगेटेड पुणे प्रा.लि (ग्रा.क्र. १८४८१९०४९४४०) या ग्राहकाला ४७३२९० युनीट वीजचोरी पोटी १ कोटी ११ लाख १९ हजार ८५७, मे. थर्मोलाईट पॅकेजिंग इंडिया प्रा.लि. (ग्रा.क्र. १८४८१९०२१८९२) या ग्राहकाला २०५६०६ युनीट चोरीचे ५१ लाख ३४ हजार ९७० तर मे.श्री. भगवान ट्यूब प्रा.लि (ग्रा.क्र. १८४८१९०३३४४०) या ग्राहकाला २३४९६१ युनीट चोरीसाठी ४२ लाख २५ हजार १६४ रुपये असे तीन ग्राहकांचे मिळून २ कोटी ४ लाख ७९ हजार ९८८ रुपये दंडाचे बील कंपनीचे मालक मुकेश ओमप्रकाश अगरवाल यांना देण्यात आले आहे.
यांनी केली कामगिरी
मुख्य अभियंता सुनिल पावडे, अधीक्षक अभियंता म्हसू मिसाळ यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता संदीप दरवडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता किशोर शिंदे, उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, सहा. अभियंता गौरी काळंगे व बाळासाहेब टेंगले, कनिष्ठ अभियंता श्रीकांत ताटीकोंडा, जनमित्र विश्वनाथ किंदरे व ज्ञानेश्वर आहिरकर यांनी ही कामगिरी यशस्वी केली.
Electricity theft worth 2 crores caught with the help of drones, a case has been registered in the police station