ज्योतिष शास्त्री प्रशांत चौधरी
येत्या गुरुवारपासून (९ नोव्हेंबर) दिवाळीच्या उत्सवाला प्रारंभ होत आहे. अतिशय चैतन्यमयी आणि मंगल अशा या उत्सवाची जणू वर्षभर वाट पाहिली जाते. यंदाच्या दिवाळीचे मुहूर्त, महत्त्व आणि विशेष आपण आता जाणून घेऊया…
९ नोव्हेंबर पासुन वसुबारस
दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस. यंदा ९ नोव्हेंबर अश्विन वद्य एकादशी या दिवशी आहे. त्याला गोवत्स द्वादशी किंवा रमा एकादशी असे देखील म्हणतात. या दिवशी सायंकाळी आकाश कंदिल लावणे, पणत्या लावून दीपावलीचे स्वागत करावे. त्याचप्रमाणे सायंकाळी ६.४५ पासून ८.१५ मिनिटापर्यंत गोवत्स अर्थात गाय व वासराचे पूजन करावे…..
१० नोव्हेंबर वार शुक्रवार- धनत्रयोदशी, यमदीपदान
अश्विन वद्य त्रयोदशी हा दिवाळीचा दुसरा दिवस. म्हणजे धनत्रयोदशी. याच दिवशी धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. भगवान धन्वंतरी पूजन केले जाते. यमदीपदान म्हणजे सायंकाळी कणकेचा दिवा करून त्याची वात दक्षिण दिशेकडे ठेवून तो प्रज्वलित करणे. समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. त्यांनी देवांना अमृत देऊन अमर केले. धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. याच दिवशी यमाचीही पूजा केली जाते.
या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा केली जाते. सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा केली जाते. मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावला जातो. तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाची खरेदी केली जाते. स्नान करून प्रदोष काळात घाट, गोशाळा, विहीर, मंदिर आदी स्थानांवर तीन दिवस दिवा लावला जातो.
१२ नोव्हेंबर- रविवार – नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन
अश्विन वद्य चतुर्दशी हा दिवळीचा तिसरा दिवस. या दिवशी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. कुबेर पूजन, अभ्यंगस्नान, लक्ष्मीपूजन या दिवशी केले जाते. लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त दुपारी १:४५ ते ३:१० सायंकाळी ६.०० वाजेपासून रात्री ८.५० मिनिटापर्यंत आहे….
आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. नरकासूर राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. यामागील कहाणी अशी आहे की, नरकासूर नावाचा असूर मानवांना पीडा देत होता. तेव्हा श्रीकृष्णाने त्याचा वध केला. मरताना नरकासुराने वर मागितला, की आजच्या तिथीला मंगल स्नान करणार्याला नरकाची पीडा होऊ नये. या दिवशी अभ्यंगस्नान करतात.
श्री लक्ष्मीपूजनाच्या वेळी अक्षतांनी बनवलेले अष्टदल कमल किंवा स्वस्तिक यांवरच श्री लक्ष्मीची स्थापना केली जाते. त्यानंतर लक्ष्म्यादी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात.
१४ नोव्हेंबर – मंगळवार बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा व वही पूजन
बलिप्रतिपदा, आणि दिवाळी पाडवा, बली प्रतिपदा अर्थात दिवाळीतला पाडवा या दिवशी पत्नीने पतीचे औक्षण करावे. बलिप्रतिपदा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस होय. वही पूजनाचा मुहूर्त, पहाटे २:३० ते ५:३० सकाळी ६:४५ ते ७:३५,१०:५५ ते १३:४५. सायंकाळी ६:०० ते ८:००
१५ नोव्हेंबर -बुधवार, यम द्वितीया भाऊबीज,
बहिणीने भावास ओवाळले
७:०० ते ९:०० दुपारी १ ते २:३० सायंकाळी ६:०० ते ८:००
सर्व वाचकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा