इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – ब्राझीलच्या राजकीय दूतावासामार्फत ब्राझील सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची आज मुंबई येथे भेट घेऊन कृषी, कृषी व्यापार व गुंतवणूक आदी विषयांवर चर्चा केली. यावेळी ब्राझीलच्या शिष्टमंडळाने मंत्री मुंडे यांना ब्राझील भेटीचे निमंत्रण दिले.
कृषिमंत्री मुंडे यांनी ब्राझीलच्या शिष्टमंडळातील अधिकाऱ्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. कमी पावसात जास्तीत जास्त उत्पादित होणारे सोयाबीन, वातावरण बदलावर व त्यानुसार शेतीमध्ये केलेले प्रयोग, त्याचे संशोधन, कमी पाण्यात उसाचे अधिकाधिक उत्पादन करणे तसेच बेदाण्याची ब्राझीलमध्ये मोठी मागणी असल्याने त्यावरील आयात कर कमी करणे, ब्राझील या देशासोबत तेथील यांत्रिकीकरणामुळे शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या बाबी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना ब्राझीलला पाठवण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. तसेच शिष्टमंडळाने मंत्री मुंडे यांना नोव्हेंबरमध्ये ब्राझील दौऱ्याचे निमंत्रण दिले. याशिवाय दिल्लीमध्येही होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.
या शिष्टमंडळात ब्राझील दूतावासाचे सचिव तथा व्यापार व गुंतवणूक विभागाचे प्रमुख वेगणर, भारतीय दूतावासातील राजदूत केनेथ नोब्रेगा, कौन्सिल जनरल जोआओ मेंदोना, कृषी विभागाचे अँजिलो किरोज आदी अधिकाऱ्यांचा समावेश होता. मंत्री मुंडे यांनी राज्यातील पारंपरिक शेती व त्यामध्ये होत असलेल्या नवनवीन प्रयोगांविषयी माहिती दिली तसेच राज्यातील कृषी क्षेत्रात असलेल्या गुंतवणुकीच्या संधींबाबतही माहिती दिली.
Meeting of the Brazilian delegation with Agriculture Minister Dhananjay Munde