इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : धरमदेव आनंद ऊर्फ देव आनंद हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक होते. सुमारे ६५ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत यांनी ११४ चित्रपटांमध्ये अभिनय केला. भारताच्या केंद्रशासनाने इ.स. २००१ साली पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला होता. मात्र देवानंद यांचे कित्येक वर्षांपूर्वीचं जुने घर आता २२ मजली टॉवरमध्ये रूपांतरित होणार आहे. देवानंद आणि त्यांची पत्नी कल्पना कार्तिक यांनी मुंबईतील या घरात सुमारे ४० वर्ष घालवली होती. पण आता त्यांच्या या घराची विक्री झाली आहे. देवानंद यांना दोन मुले असून त्यांनी हे घर विकण्याचा निर्णय घेतला आहे.
जुहूतील हा बंगला एका कंपनीला विकला
देव आनंद यांचा जुहूतील बंगला एका कंपनीला विकण्यात आला आहे. घराची डील झाली असून सध्या कागदोपत्री काम सुरू आहे. ३५० ते ४०० कोटींमध्ये हा अतिशय प्राइम लोकेशनवरील बंगला विकण्यात आला आहे. देव आनंद यांचा बंगला आता ज्याठिकाणी आहे, त्याठिकाणी बंगला पाडून २२ मजली इमारत उभी राहणार आहे. मात्र देवानंद यांनी हा बंगला बांधला होता, त्यावेळी आता बंगला असलेली जागा इतकी प्रसिद्ध नव्हती. पण आता जुहूतील हा परिसर सर्वात पॉश आणि महागड्या जागांपैकी एक आहे. दरम्यान, देवानंद यांच्या पत्नीचे नाव कल्पना कार्तिक आहे. त्यांना दोन मुले असून मुलगा सुनील आनंद आणि मुलगी देविना आनंद होय. देव आनंद यांच्या मुलांनीच हा बंगला विकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे.
बंगल्याच्या देखरेखीसाठी कुणीही नाही
सिनेसृष्टीवर व प्रेक्षकांच्या मनावर पाच दशकांपेक्षा जास्त काळ अधिराज्य गाजविणारे विख्यात अभिनेते देव आनंद यांच्या जुहू येथील प्रसिद्ध बंगल्याची खरेदी मुंबईतील एका प्रसिद्ध बांधकाम कंपनीने खरेदी केल्याचे चर्चा आहे. या बंगल्याच्या जागी लवकरच आलिशान टॉवर उभारण्यात येणार असल्याचे समजते. जुहू येथे समुद्र किनारी देव आनंद यांचा आलिशान बंगला आहे. त्या बंगल्यात ते जवळपास ४० वर्षे राहिले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी कल्पना कार्तिक, मुलगा व मुलगी तिथे राहात होते.
मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर पत्नी व मुलगी उटी येथे वास्तव्यास गेले. त्यांचा मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला आहे. त्यामुळे बंगल्याच्या देखरेखीसाठी कुणीही नसल्याने त्याची विक्री करण्याचा निर्णय आनंद कुटुंबीयांनी घेतल्याची माहिती आहे. देव आनंद यांचे २०११ मध्ये निधन झाले. त्यानंतर मुंबईतील त्यांच्या मालकीच्या स्टुडिओची विक्री करण्यात आली होती. तर काही काळापूर्वी त्यांच्या पनवेल येथील मालमत्तेचीही विक्री करण्यात आली. मात्र बंगल्याची विक्री झाल्याचे वृत्त असले तरी देव आनंद यांचे पुतणे केतन आनंद यांनी मात्र या विक्रीच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
Actor Devanand’s luxurious bungalow will become Zamindost…