नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशातील दिग्गज कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले. त्याविरोधात कुस्तीपटूंनी आंदोलन छेडले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आंदोलन थांबले, मात्र बृजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढल्या. आता तर दिल्ली पोलिसांनी त्यांच्याबद्दल केलेले विधान सर्वत्र चर्चेत आहे.
दिल्ली पोलिसांनी भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध ताजिकिस्तानमधील काही घटनांचा हवाला कोर्टात दिला. ताजिकिस्तानमधील आशियाई चॅम्पियनशिप दरम्यान बृजभूषण सिंह यांनी परवानगीशिवाय महिला कुस्तीपटूचा शर्ट उचलला आणि तिच्या पोटाला अनुचित रित्या स्पर्श केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर या घटना भारताबाहेर जरी घडल्या असल्या तरी त्यांच्या या प्रकरणाशी संबंध असल्याचा युक्तिवाद दिल्ली पोलिसांनी यावेळी केला आहे.
तसेच या घटना त्यांच्या कृती प्रतिबिंबित करतात असा दावा देखील कोर्टात केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कार्यक्रमादरम्यान बृजभूषण सिंह यांनी एक महिला कुस्तीपटूला जबरदस्तीने मिठी मारली आणि त्यानंतर ही मिठी वडिलांप्रमाणे असल्याचे सांगून कृत्याचे समर्थन केले होते. बृजभूषण सिंह यांना लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली न्यायालयामध्ये हजर राहण्यासाठी एक दिवसाची सूट दिली आहे. तर यावेळी दिल्ली पोलिसांनी न्यायालयामध्ये एक खळबळजनक विधान केले आहे. ‘बृजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे शोषण करण्याची एकही संधी सोडली नाही, असे दिल्ली पोलीस म्हणाले आहे. तर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचा युक्तिवाद देखील यावेळी पोलिसांनी केला.
दिल्लीतच व्हावी कारवाई
दरम्यान या प्रकरणाची सविस्तर सुनावणी ही ७ ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल. बृजभूषण सिंह यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमधून सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीने देखील त्यांना दोषमुक्त केले नाही. तसेच त्यांच्यावरील कारवाईसाठी दिल्ली हे योग्य अधिकारक्षेत्र असल्यांच यावेळी दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.
Brijbhushan Singh’s problems increased.