इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि नागरी व्यवहारमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज नवी दिल्लीत कर्तव्य पथ येथून पहिल्या हरित हायड्रोजन इंधन सेल बसला हिरवा झेंडा दाखवला. शालेय विद्यार्थी, अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत पहिल्या हायड्रोजन सेल बस ला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर हरदीप सिंग पुरी यांनी हायड्रोजन इंधनाची संकल्पना आणि भविष्यातील इंधन म्हणून त्याची उपयोगिता याविषयी माहिती दिली.
हायड्रोजन बस चालवण्यासाठी फ्युएल सेल हायड्रोजन आणि वायूचा वापर करून वीजनिर्मिती केली जाते आणि या वाहनांमधून केवळ पाणी बाहेर पडतं. त्यामुळे, हायड्रोजन इंधनावर चालणारी वाहनं ही पेट्रोल आणि डिझेल वर चालणाऱ्या पारंपरिक बस गाड्यांपेक्षा पर्यावरणास सर्वात अनुकूल अशी वाहनं आहेत. तिप्पट ऊर्जा घनता आणि हानिकारक उत्सर्जन होत नसल्यामुळे, हायड्रोजन हे ऊर्जेच्या आवश्यकतेमधील हे अधिक कार्यक्षम पसंती म्हणून उदयाला येईल, असे पुरी यांनी सांगितले. याशिवाय, हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बसगाड्या चार्ज करण्याकरता अवघ्या काही मिनिटांचा कालावधी लागतो, असे ते म्हणाले.
येत्या दोन दशकांमध्ये हायड्रोजन आणि जैव इंधनासारखे उदयोन्मुख इंधनाचे प्रकार जागतिक स्तरावरील इंधनाच्या वाढत्या गरजेच्या २५ टक्के वाटा पूर्ण करतील असे पुरी यांनी केंद्र सरकारच्या स्वच्छ आणि हरित ऊर्जा संबंधी महत्वाकांक्षी योजनांबद्दल माहिती देताना सांगितले. “जगातील सर्वात मोठ्या सिंक्रोनस ग्रिड्सपैकी एक असलेल्या, भारताने ‘वन नेशन-वन ग्रिड-वन फ्रिक्वेन्सी’ प्राप्त केली आहे आणि लवकरच हायड्रोजनचे उत्पादन आणि निर्यात या क्षेत्रात भारत एक जागतिक उत्पादक म्हणून आपले स्थान निर्माण करेल आणि हरित हायड्रोजनचे केंद्र म्हणून उदयाला येईल, असे त्यांनी सांगितले.
1st Green Hydrogen Fuel Cell Bus from Kartavya Path, New Delhi