इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – नोकरशहा आपल्या व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक आहे. लोकशाही यशस्वी करायची असल्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांवर त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी असते. मात्र, काही प्रशासकीय अधिकारी स्वत:च्या पदाचा गैरवापर करतात आणि नोकरशाहीची प्रतिमा मलीन होते. अशा घटना सातत्याने घडत असतानाच दिल्लीत एका महिला अधिकाऱ्याने कुत्र्याला फेरफटका मारण्यास अडथळा निर्माण होऊ नये म्हणून चक्क संपूर्ण स्टेडियम रिकामे करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आता या प्रकरणी या महिला अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झाली आहे.
जवळपास दीड वर्षापूर्वी मे महिन्यात हा प्रकार घडला. २६ मे २०२२ रोजी आयएएस रिंकू डग्गा आणि त्यांचे पती संजीव खैरवार हे संध्याकाळी दिल्लीतल्या त्यागराज स्टेडियमवर फेरफटका मारायला आले असता तिथे अनेक खेळाडू सराव करताना दिसले. तसेच, काही नवोदित खेळाडूंचे व विद्यार्थ्यांचे पालकही तिथे उपस्थित होते. संबंधित आयएएस दाम्पत्याबरोबर त्यांचा एक पाळीव कुत्राही होता.
आपल्या कुत्र्याला फेरफटका मारण्यात खेळाडू व त्यांच्या पालकांची अडचण होत असल्याची तक्रार या दाम्पत्याने केली. कुत्र्याला विनासायास फेरफटका मारता यावा, यासाठी रिंकू डग्गा व संजीव खैरवार यांनी ते आख्खं स्टेडियमच कर्मचाऱ्यांना रिकामं करायला लावलं. ‘साहेबां’चा आदेश आल्यामुळे कर्मचाऱ्यांनीही सर्व खेळाडू व त्यांच्या पालकांना स्टेडियमच्या बाहेर काढलं आणि आयएएस दाम्पत्याचा त्यांच्या पाळीव कुत्र्यासोबत निवांत फेरफटका सुरू झाला. त्यांचा फेरफटका मारून झाल्यानंतरच खेळाडूंना मैदानात येण्याची परवानगी मिळाली.
दिली सक्तीची निवृत्ती
माध्यमांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर प्रशासनाला जाग आली. हे प्रकरण केंद्र सरकारपर्यंत गेल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांच्या गृहखात्याने आयएएस महाशय व त्यांच्या आयएएस पत्नी यांची दिल्लीबाहेर बदली केली. संजीव खैरवार यांची बदली लडाखला तर रिंगू डग्गा यांची बदली थेट अरुणाचल प्रदेशमध्ये करण्यात आली. मात्र, या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आयएएस दाम्पत्याने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे आता रिंगू डग्गा यांच्यावर सक्तीच्या निवृत्तीची कारवाई करण्यात आली आहे.
This big action was taken against the officer