इंडिया दर्पण ऑनलाईन वृत्तसेवा
सर्वच समाजात आजही मुलगा व मुलगी असा भेदभाव केला जातो. आज कोणत्याही क्षेत्रात मुली मागे नाहीत. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात नाव कमविले आहे. आपल्याकडील विवाहसंस्थेच्या प्रश्नांमुळे पालकांना अनेक अडचणी येतात. त्यामुळे मुलगी नको, हा नारा आजही अनेक ठिकाणी दिसतो. काही ठिकाणी तो थेट असतो, तर काही ठिकाणी छुपा. लगतच्या काळात अशा काही घटना समोर आल्या आणि आपण कितीही शिकलो, प्रगत झालो, तरी मुलगा-मुलगी हा भेद मनात आहेच, हे सिद्ध झाले. अशा एका घटनेत तिसरी मुलगी झाल्याने संतापलेल्या आईने आपल्या पोटच्या पाच दिवसांच्या चिमुकलीची गळा घोटून हत्या केली.
पोलिसांनी निर्दयी आईला केली अटक
नकोच ती मुलगी, या मानसिकतेमुळे आजही अशा अंगावर काटा आणणाऱ्या घटना आजूबाजूला घडताना पाहून समाजमन सुन्न होते. काही काळ हळहळ व्यक्त करते. २१व्या शतकात येऊन स्थिरावल्यानंतरही ही मानसिकता बदलायला मात्र ते तयार नाही. मुलगी नको याला मानसिकतेला कोणीही अपवाद नाही. शहर, गाव, शिकलेला, न शिकलेला, श्रीमंत, गरीब, जात – पात, धर्म सगळीकडे मुलींना नाकारले जात असल्याचे दिसते. अट्टहासामुळे नकोशा असलेल्या मुलींचा त्या जन्माला येण्याआधीच गळा घोटला जातो. मुलगा होईपर्यंत मुलींना जन्माला घालून, त्यांना जन्मभर नकोशा असल्याची जाणीव करून देत त्यांचे जगणे, उमलणेच कोमेजून टाकले जाते. मुलगा जन्माला आल्याखेरीज पालकांना जन्म सार्थकी लागल्याचे वाटत नाही.
जळगाव जिल्ह्यात काही दिवसापूर्वी अशीच घटना घडली बापाने मुलीच्या तोंडात तंबाखू टाकून ठार केले होते. त्याचप्रमाणे पुण्यात नुकताच असाच धक्कादायक एक प्रकार घडला. चौथीही मुलगी झाली म्हणून उंबऱ्याच्या आतही न घेता आई – वडिलांनीच तिला हॉस्पिटलमधून तिला थेट अनाथालयाचा रस्ता दाखविला. आजही मुली नकोशाच आहेत, याची दाहकता स्पष्ट करतो. अशा हजारो घटना राज्यात आणि देशभरात होताना दिसत आहेत. आणखी एक भयानक घटना पालघर परिसरातील तारापूर येथे घडली. तिसरी मुलगी झाल्याने संतापलेल्या सख्या आईने पाच दिवसांच्या चिमुकलीची गळा घोटून हत्या केली. तारापूर पोलिसांनी निर्दयी आईला अटक केली असून पोलिसांकडून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेत्र संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
अन् मुलीचा मृतदेह नदीत फेकला
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे परक्याचे धन, हे वर्षानुवर्षे रुढी, परंपरांच्या माध्यमातून प्रत्येक पिढीत झिरपत राहिले आहे. किंबहुना तशी सोयच करून ठेवण्यात आली आहे. शहर असो की खेडे येथे अशाच प्रकारे घटना घडताना दिसतात. तारापूरमध्ये राहणाऱ्या श्रेया प्रभू (वय ३२ ) या विवाहितेला आधी दोन संतान होती. त्यातील पहिली मुलगी आणि दुसरा मुलगा होता. अशातच आरोपी महिला तिसऱ्यांदा गरोदर राहिली. आपल्याला तिसऱ्यांदा मुलगाच होईल अशी तिला अपेक्षा होती. मात्र मुलगी झाल्याने तिचा अपेक्षाभंग झाला आणि तिला संताप अनावर झाला. त्यामुळे या निर्दयी आईने कोणताही मागचा पुढचा विचार न करता आपल्या पोटच्या मुलीचा जीव घेतला. अवघ्या पाच दिवसांच्या चिमुकलीची हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याशिवाय हत्येचा पुरावा सापडू नये म्हणून या क्रुर मातेने आपल्या चिमुकल्या मुलीचा मृतदेहही नदीत फेकला होता. नवजात बाळाच्या तपासणीसाठी आशा सेविका आरोपी श्रेया प्रभू हिच्या घरी गेली असता आरोपीने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर या घटनेची माहिती तारापूर पोलिसांना मिळाली असता आरोपी महिलेला अटक केली, आता तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावली असून अधिक तपास सुरू आहे.
The third girl was also born…mother did this serious act