मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अभ्यासिका वर्गांच्या ऑनलाईन उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रकाश सुर्वे, अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक अनिल गावीत यासह 418 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य व विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आज चाळीस हजार विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित आहेत, त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. नव्याने सुरू झालेल्या ७५ आभासी क्लासरूम आणि आज सुरू झालेल्या अभ्यासिका यांचा विद्यार्थी लाभ घेवून स्वविकास करतील, अशी मला आशा आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल इंडिया व डिजिटल इंडियाला प्रोत्साहन दिले असून, देशात विविध योजना राबविल्या जात आहेत. याच धर्तीवर राज्यात देखील कौशल्य विकास विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मंत्री श्री. लोढा यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख तरूणांना रोजगार प्राप्त झाला असून, कौशल्य विकास प्राप्त युवकांना भविष्यातही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. उद्योजकतेला लागणारे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान लक्षात घेऊन आयटीआयमध्ये विविध 900 कोर्सेस शिकवले जातात, ही अभिमानाची गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य हे नेहमी देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून काम करत आहे. परदेशी गुंतवणूक आणि पायाभूत सुविधांमध्ये देखील राज्य प्रथम क्रमांकावर आहे. यामुळेच आज अनेक उद्योजक राज्यात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असतात. हीच बाब लक्षात घेऊन उद्योग जगताला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून आपण नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान युवा पिढीला देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
नवीन अभ्यासिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना
अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण होईल – मंत्री मंगल प्रभात लोढा
मंत्री श्री. लोढा म्हणाले की, राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थामधील प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पूरक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या रोजच्या प्रशिक्षण वेळेनंतर संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत अभ्यासिका सुरू करण्यात आल्या आहेत. यू. पी. एस. सी.आणि एम. पी. एस. सी. तसेच स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, १०वी आणि १२ वी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येईल. मुले व मुलींकरिता स्वतंत्र वर्ग खोल्या उपलब्ध करुन देण्यात येतील. यामध्ये पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह व इतर सुविधा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत असेही मंत्री श्री. लोढा म्हणाले.
यावेळी मंत्री लोढा यांच्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये कौशल्य विकास विभाग, महिला बाल विकास विभाग, पर्यटन विभाग आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री म्हणून केलेल्या कामगिरीचा आढावा ‘स्वयंसेवक ते जनसेवक’ या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
The information given by the Chief Minister is that three lakh candidates have been given employment through this department