छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिद्धार्थ उद्यानातील ‘अर्पिता’ या वाघिणीने काही दिवसांपूर्वी बछड्यांना जन्म दिला. या बछड्यांचे नामकरण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते चिठ्ठी काढून करण्यात आले. अर्पिता वाघिणीने दोन नर व एक मादी बछड्याला जन्म दिला होता.
त्यांची नावे चिठ्ठी निवडून देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या चिठ्ठ्या काढल्या. त्यावरील ‘श्रावणी’, ‘विक्रम’ आणि ‘कान्हा’ अशी नावे या बछड्यांना देण्यात आली. बछड्यांची नावे घोषित होताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
या नामकरणावरुनही वाद पेटला आहे. पहिली चिठ्ठी मुख्यमंत्र्यांनी काढण्या नंतरत्यात श्रावणी नाव आले.पण, दुसरी चिठ्ठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढल्यानंतर त्यात आदित्य नाव आले.पण, ही चिठ्ठी बाजूला ठेवण्यात आली. त्यानंतर दुसरी चिठ्ठी काढण्यात आली. त्यात विक्रम हे नाव आले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढलेल्या चिठ्ठीत कान्हा हे नाव आले. पण, आदित्य या नावाची चिठठी बाजूला ठेवल्यामुळे त्यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांनी यावर जोरदार टीका केली आहे.
या नावावरुन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोरदार टीका केली आहे. हे कोणताही आदित्य लपवू शकत नाही. तो पृथ्वीतलावरचा असेल किंवा पृथ्वीतलावरचा नसेल. जमिनीवर एक आदित्य असल्याचं सर्वांना माहीत आहे. त्याचं नाव कोणाला असेल किंवा नसेल त्याचा फरक पडत नाही. आदित्यला तळपण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. कुणी कितीही तिरस्कार केला तर फरक पडत नाही. माझ्या शुभेच्छा आहे त्यांनी असाच तिरस्कार करावा आदित्य अजून तळपेल.
Chief Minister Eknath Shinde named Arpita Vaghini’s calves