इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी दिल्ली – गहू आणि पिठाच्या वाढत्या किंमती विचारात घेता केंद्र सरकार आता स्वस्तात पीठ विकण्याचा विचार करत आहे. स्वस्त पिठाची किंमत २७ रुपये किलो असू शकते. सात तारखेपासून त्याची विक्री सुरू होऊ शकते. याअगोदर सरकारने स्वस्तात डाळी बाजारात विकायला सुरुवात केली आहे.
सरकारी पीठ भारत ब्रँड अंतर्गत विकले जाईल. हे दहा आणि तीस किलोच्या पॅकिंगमध्ये विकले जाऊ शकते. ‘नॅशनल कंझ्युमर कोऑपरेटिव्ह फेडरेशन’ (एनसीसीएफ)ला यासाठी नोडल एजन्सी बनवले जाऊ शकते. भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) भारत ब्रँडच्या पिठासाठी केंद्रीय राखीव साठ्यातून २.५ लाख टन गव्हाचे वाटप करत आहे. सध्या पीठ ३५ रुपये किलोने विकले जात आहे. त्याचबरोबर ब्रँडेड पीठ ४० ते ५० रुपये किलोने विकले जात आहे. या वर्षी जून-जुलैमध्ये डाळींच्या वाढत्या किमती पाहता केंद्र सरकारने भारत ब्रँड नावाने स्वस्त चणा डाळ विकण्यास सुरुवात केली होती. त्या वेळी १०० रुपयांपेक्षा जास्त दराने डाळ विकली जात होती. सध्या ६० रुपये किलो या भावाने डाळ विकण्यात येत आहे.
‘नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (नाफेड), ‘नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया’ (एनसीसीएफ), केंद्रीय भंडार आणि सफाल यांच्या रिटेल आउटलेट्सद्वारे भारत आट्याचे वितरण केले जाऊ शकते. या व्यवस्थेअंतर्गत, राज्य सरकारांना त्यांच्या कल्याणकारी योजना, पोलिस, कारागृहात पुरवठा करण्यासाठी आणि राज्य सरकार नियंत्रित सहकारी संस्था आणि महामंडळांच्या किरकोळ दुकानांमधून वितरणासाठी स्वस्त पीठ उपलब्ध करून देता येईल. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात याची खात्री करण्यासाठी केंद्र सरकार किंमत स्थिरीकरण निधी राखून ठेवला आहे. या अंतर्गत, ते काही कृषी मालाचा बफर स्टॉक ठेवते.
The central government will sell flour cheaply… will this be the price?