नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – १९ लाख ९६ हजार रुपयांच्या कथित लाच प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) एका खासगी कंपनीचा मालक, खाजगी व्यक्ती, ब्रिज अँड रुफ कंपनी(इंडिया) लि. चा कार्यकारी सचिव( सरकारी कर्मचारी) इत्यादींसह सात जणांना अटक केली आहे. एका खाजगी कंपनीचा मालक, इतर खाजगी व्यक्ती, ब्रिज अँड रुफ कंपनी(इंडिया)लि. चे अज्ञात सरकारी कर्मचारी आणि इतर अज्ञात खाजगी व्यक्तींविरोधात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
ओडीशामधील, एकलव्य आदर्श निवासी शाळा (EMRS) कडून खाजगी कंपनीला देण्यात आलेले टेंडर मिळवण्यासाठी ब्रिज अँड रुफ कंपनी(इंडिया)लि. कोलकाता, या कंपनीच्या एका अज्ञात सरकारी कर्मचाऱ्याशी संगनमत करून आरोपींनी एक कट रचला होता, असा आरोप आहे. या आरोपात पुढे असेही नमूद आहे की कोलकात्याच्या ब्रिज अँड रुफ कंपनी(इंडिया)लि. च्या अज्ञात अधिकाऱ्यांच्या वतीने एक खाजगी व्यक्ती(कोलकात्याचा निवासी) या खाजगी कंपनीला सदर टेंडर मिळवून देण्यासाठी अवाजवी मदत करण्यासाठी सदर कंपनीच्या मालकाकडून थेट त्याबरोबरच दुसऱ्या एका खाजगी व्यक्तीकरवी लाच मागत होता. तसेच या कंपनीच्या मालकाने ब्रिज अँड रुफ कंपनी(इंडिया)लि. च्या अज्ञात अधिकाऱ्यासाठी सदर खाजगी व्यक्तीला सुमारे २० लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, असाही आरोप आहे.
कथित हवाला माध्यमांच्या मार्फत लाचेची रक्कम कोलकात्याच्या खाजगी व्यक्तीकडे पोहोचल्यावर एक सापळा रचण्यात आला आणि सदर खाजगी व्यक्ती आणि दुसऱ्या एका खाजगी व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. या खाजगी व्यक्तीकडून १९ लाख ९६ हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.
त्यांच्या चौकशीत असे आढळले की ही रक्कम ब्रिज अँड रुफ कंपनी(इंडिया)लि. च्या सीएमडीच्या कार्यकारी सचिवाला(एका सरकारी कर्मचाऱ्याला) देण्यासाठी आणली होती. त्यामुळे सदर कार्यकारी सचिव आणि दुसऱ्या एका खाजगी कर्मचाऱ्याला देखील पकडण्यात आले.
कोलकाता, दिल्ली, नॉयडा, मुंबई, नागपूर, राजकोट इ. ठिकाणी असलेल्या आरोपींच्या संकुलांवर छापे घालण्यात आले ज्यामध्ये गुन्ह्यातील सहभागाशी संबंधित अनेक कागदपत्रे, डिजिटल पुरावे आणि सुमारे २६ लाख ६० हजार रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली. कंपनीच्या मालकाला अहमदाबाद येथील सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात आले आणि त्याला २१ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या उर्वरित आरोपींना सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात येईल.
Big action by CBI; Seven persons arrested in bribery case of 19 lakh 96 thousand