इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : शीर्षक वाचून आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही. मात्र, नाश्ता करणे महत्त्वाचे असून तो न केल्यास कर्करोगाची शक्यता बळावत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तेव्हा सकाळच्या नाश्त्याला गांभीर्याने घेत तो लवकरच सुरू करा, असा सल्ला देण्यात येत आहे.
सकाळचा नाश्ता न करता थेट जेवण करणारे अनेक जण आहेत. तर बरेच लोक सकाळचा नाश्ता हमखास करतात. प्रत्येकजण आपापल्या सवयीनुरुप नाश्ता करणे चांगले वा वाईट ठरवत असतो. परंतु, तज्ज्ञांचे ऐकाल तर नाश्ता न करणे हे कर्करोगाला कारणीभूत ठरू शकणार आहे.
रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी उशिरा उठणे, नाश्ता आणि जेवण एकत्र करणे किंवा नाश्ता न करणे ही आताची जीवनशैली असल्याचे दिसते. अनेकांना लवकर कार्यालयात जायचे असल्यामुळे केवळ चहा, कॉफी पिऊन जाण्याकडे कल असतो. नाश्ताची वेळही निश्चित नसते. परंतु, ही जीवनशैली योग्य नाही. सकाळचा नाश्ता न केल्यामुळे, तसेच अनियमित वेळा उपाशी राहिल्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता असते.
मुंबईच्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे उपसंचालक डॉ शैलेश श्रीखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,‘सकाळचा नाश्ता वगळल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्टचा कर्करोग होण्याची शक्यता असते. या अभ्यासानुसार, दररोज नाश्ता करणाऱ्या लोकांच्या तुलनेत जे आठवड्यातून एकदा-दोनदा किंवा नाश्ता न करणाऱ्या लोकांना अन्ननलिका आणि कोलोरेक्टल (अन्ननलिकेचा गुदद्वाराजवळील भाग) यांचा कर्करोग होऊ शकतो. तसेच पित्ताशयाच्याही कर्करोग होण्याची शक्यता वाढते. ६३ हजार लोकांवर प्रयोग करून ५ वर्षे अभ्यास करण्यात आला. एकूण सहभागींमध्ये ३६९ लोकांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कर्करोग झाला.’
असे होतात परिणाम
नाश्ता न केल्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल मार्गाची जळजळ होते. यामुळे कालांतराने कर्करोग होऊ शकतो. जठरासंबंधी आणि आतड्यांसंबंधी पाचक रस आणि अन्य स्राव चोवीस तास स्रवत असतात. आपण जेव्हा खातो, तेव्हा ते अन्नामध्ये समाविष्ट होतात. आपण जेव्हा जेवत नाही, तेव्हाही हे स्राव स्रवत असतात. जर त्यांना अन्न मिळाले नाही, तर ते आतड्यांवर, अन्ननलिकेच्या अस्तरावर काम करू लागतात. हे आम्ल १०० टक्के हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे. या ऍसिडमुळे पोटावर आणि आतड्यांवरील अस्तरांवर प्रभाव पडतात. त्यामुळे या अवयवांचे नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे कर्करोग होण्याची शक्यता निर्माण होते.
Risk of cancer if you don’t have breakfast in the morning? what is true